
राज्यातील बोगस डॉक्टर आणि अनधिकृत नर्सिंग होमवर कडक कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच विशेष टास्कफोर्स स्थापन केला जाईल. पुढील अधिवेशनात या समितीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली. राज्यातील विशेषतः मुंबईतील अनधिकृत खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम तसेच बोगस डॉक्टरांवरील कारवाई याबाबत आमदार चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले, महाराष्ट्र शुश्रूषा नोंदणी अधिनियम, 1949 तसेच संबंधित नियमांनुसार राज्यात खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमची नोंदणी व तपासणी केली जाते. मात्र काही ठिकाणी विनानोंदणी किंवा अनधिकृत नार्सिंग होम सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत नर्सिंग होमवर कारवाई करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कायदे आहेत, पण अंमलबजावणी होत नाही
टास्क फोर्स तयार केले हे स्वागतार्ह आहे. कायदे आहेत पण त्याची योग्यरीत्या अंमलबजावणी होत नाही. फक्त दंडात्मक कारवाई करून काही साध्य होणार नाही याकडे शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी लक्ष वेधले. त्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले.





























































