
गद्दारी करून सत्तेत आलेल्या मिंधे गटाचा खरा चेहरा वारंवार उघड झाला आहे. आता तर मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच गटाच्या मंत्र्यावर तोंडसुख घेतले आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत निष्क्रिय असल्याचा पंचनामा मिंधे गटाच्या तळा तालुकाप्रमुखाने पत्रकार परिषद घेऊन केला.
श्रीवर्धन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संपविण्याचे काम उदय सामंत करीत असल्याची टीका शिंदे गटाचे तळा तालुकाप्रमुख प्रदूम ठसाळ यांनी केला आहे. आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सामंत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.
यावेळी बोलताना प्रदूम ठसाळ म्हणाले की, उदय सामंत रायगडचे पालकमंत्री झाल्यापासून आम्हाला निधी मिळालेला नाही. एकदाही त्यांनी तळा तालुक्याला भेट दिलेली नाही. पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या नाहीत, आढावा बैठक घेतली नाही. त्यामुळे तळा तालुक्यासह श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे गटाची ताकद संपत चालली असल्याची कबुलीच ठसाळ यांनी दिली. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य लीलाधर खातू, शहरप्रमुख राकेश वडके, भास्कर गोळे उपस्थित होते.
मंदा म्हात्रे, विजय चौगुले यांच्या आरोपांचे फटाके; गणेश नाईकांची गळचेपी नेमकी कोणाच्या आदेशावरून?
फोनही उचलत नाहीत
एखाद्या कामासाठी फोन केला तर उदय सामंत फोनही उचलत नाहीत, शासकीय कार्यालयात आम्हाला जुमानले जात नाही असे रडगाणेही मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे आहे. याबाबत तक्रार केली तर वरिष्ठांकडून पाठबळ मिळत नसल्याने आम्ही खचलो आहोत. मुख्यमंत्री व जिल्ह्याचा पालकमंत्री आमच्या गटाचा असतानादेखील विकासकामांसाठी निधी मिळत नसेल तर सत्ता काय कामाची, असा घरचा आहेर प्रदूम ठसाळ यांनी मिंध्यांना दिला.