
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते देवाभाऊ वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी देवाभाऊ म्हणून परिचित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अचूक निशाणा साधत टोला लगावला.
देवाभाऊ वाघमारे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. एक देवाभाऊ सर्वकाही असूनही महाराष्ट्रात फोडाफोडी करतोय आणि दुसरे देवाभाऊ शिवसेनेकडे काहीही नाही, लढावे लागेल असे सांगूनही लढायला आले, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी यावेळी फडणवीसांवर शरसंधान केले. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी यावेळी मातोश्रीचा परिसर दुमदुमला. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख प्रथमेश गीते उपस्थित होते.