ही निवडणूक केवळ सत्तेची नसून, मुंबई आपल्या हक्काची ठेवायची की ती उद्योगपतींच्या चरणी वाहून द्यायची, याचा निर्णय करणारी – उद्धव ठाकरे

मुंबईतील खारदांडा येथील शिवसेना शाखा क्रमांक 99 चे उद्घाटन रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या वेळी उपस्थित शिवसैनिक व स्थानिक नागरिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आणि कोळी समाजाच्या हक्कांवर कुणालाही गदा येऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, 1968 पासून ही शाखा मराठी माणसाचा, भूमिपुत्रांचा आणि कोळी बांधवांचा बालेकिल्ला म्हणून उभी आहे. “तुम्हाला मी आलो म्हणून आनंद झाला असेल, पण मला इथे येऊन अधिक आनंद झाला आहे, कारण या शाखेने गेल्या अनेक दशकांत मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा दिला आहे,” असे त्यांनी सांगितले. शिवसेनेची स्थापना ही केवळ राजकारणासाठी नव्हे, तर भूमिपुत्रांच्या संरक्षणासाठी आणि मराठी अस्मितेसाठीच झाली, याची त्यांनी आठवण करून दिली.

सध्याच्या सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आज सत्ताधाऱ्यांचे लक्ष जनतेच्या प्रश्नांकडे नसून कोळी बांधवांच्या जमिनींकडे लागले आहे. मात्र ही जमीन गिळणे एवढे सोपे नाही आणि शिवसेना ते कदापिही होऊ देणार नाही. कोळीवाड्यांचे सीमांकन अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच मासे सुकवण्याच्या जागांवरही अतिक्रमणाचा धोका असल्याचे सांगितले. “कोळीवाड्यात येऊन नाकाला रुमाल लावणारा नव्हे, तर कोळी बांधवांसोबत बसून त्यांचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी हवा,” असे ते म्हणाले.

मुंबईच्या मराठी अस्मितेवर होत असलेल्या हल्ल्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई ही भूमिपुत्रांची आहे आणि ती कोणाच्या चरणी वाहून देण्याचा शिवसेनेचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईचे ‘अदानीकरण’ सुरू असून धारावी, कुर्ला, मिठागर, मुलुंड, वरळीतील भूखंड यांसारख्या जागा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “ही मुंबई अदानी नगरी नाही, ही मराठी माणसाची मुंबई आहे,” असे ठणकावून सांगत त्यांनी या लुटीविरुद्ध लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोस्टल रोड प्रकल्पाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून उभारण्यात आला असून केंद्र सरकारकडून एकही पैसा घेतलेला नाही. या प्रकल्पामुळे निर्माण होणारी मोकळी जागा मुंबईकरांसाठीच असेल आणि त्या जागांवर बिल्डर किंवा उद्योगपतींचा डोळा पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा, फिरता यावे आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, हाच या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मतदार यादी तपासण्याचे आवाहन केले. आपल्या नावांची नोंद योग्य आहे का, दुबार नोंदी झाल्या आहेत का, याची खात्री करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ही निवडणूक केवळ सत्तेची नसून, मुंबई आपल्या हक्काची ठेवायची की ती उद्योगपतींच्या चरणी वाहून द्यायची, याचा निर्णय करणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांना ठाम शब्दांत आश्वासन दिले की, त्यांच्या हक्काच्या जमिनीवर कुणीही हात लावण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना कायद्याच्या मार्गाने त्याला चोख प्रत्युत्तर देईल. “एक इंचही जमीन कोणालाही घेऊ देणार नाही,” असे सांगत त्यांनी शिवसैनिकांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.