
बदलापूरमध्ये अत्यंत विकृत घटना घडली. या दृष्कृत्याविरोधात, विकृतीविरोधात जो उद्रेक उसळला, ते आंदोलन राजकीय वाटणे म्हणजे विकृत मानसिकता आहे. या दृष्कृत्यामागे किंवा त्याचा निषेध करण्यामागे राजकारण आहे असे वाटत असेल तर ते सगळे विकृत आणि नराधमाचे पाठीराखे आहेत, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांची सालटी काढली. गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
बदलापुरात घडलेल्या दृष्कृत्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि इतर सर्वपक्षांनी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. हा बंद राजकीय नाही. कोरोना काळात आपण एखाद्या कुटुंबाप्रमाणे या विषाणूविरोधात लढलो होतो. तशीच वेळ पुन्हा आली असून या विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील बांधवांनी, माताभगिनींनी उस्फुर्तपणे बंद पाळावा. शाळेमध्येही मुली सुरक्षित नसतील तर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या वाक्याला काहीही अर्थ राहणार नाही. माझ्या माताभगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. यावेळी त्यांनी अत्याचाराशी घटनांशी संबंधीत बातम्यांची कात्रणं दाखवत याची दाहकता स्पष्ट केली.
पश्चिम बंगालमधील कोलकाता येथेही अशाच प्रकारची घटना घडली आणि देशभरात आगडोंब उसळला. तत्पूर्वी निर्भायाकांड घडलेले. त्यावेळीही देश खडबडून जागा झालेला. तशीची ही घटना असून सहनशिलतेचा अंत होतो तेव्हा जनभावनेचा उद्रेक होतो. कोरोना विषाणूसोबत लढलो तसाच हा विकृतीचा विषाणू आहे, असे म्हणत महाराष्ट्र बंदमध्ये कोणताही राजकीय अभिनिवेश नाही हे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असे वातावरण निर्माण झाले पाहिजे की कुणीही असे कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. विकृतांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी हा बंद आहे. माझ्या बहिणीच्या, माता-भगिनींच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे, असेही ते म्हणाले.
सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असायला हवी. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण सारख्या अनेक योजना आणता येतात. काही वर्षांपूर्वी एक कविता लिहिण्यात आलेली. उठो द्रौपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे. याचा अर्थ तुझ्या रक्षणासाठी कुणी येणार नाही असे कविने सूचवलेले आहे. ही कविता आजच्या परिस्थितीत चपखल बसते, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. बदलापूरमध्ये ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? राज्यभर या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये हात पसरून बसले होते, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाला जागावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते असा आरोप करणाऱ्यांवरही उद्धव ठाकरे यांनी आसूड ओढला. एखाद्या घटनेचा निषेध करणे राजकारण कधीपासून वाटायला लागले? निषेधही करायचा नाही का? लोकसभेच्याआधी विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक यांची हत्या झाली. त्यावेळीही जबाबदारी झटक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धटपणे विधान केले होते. गाडीखाली कुत्रे आले तरी तुम्ही राजीनामा मागणार का? असे ते म्हणाले. याचा अर्थ तुम्हाला जनतेच्या जिवाची किंमत नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे –
- बदलापूर घटनेतील मुलीची आई गर्भवती असून तिला 10-12 तास खोळंबून ठेवले. तिची तब्येत बरी नसून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. हे नक्की कुणाचे सरकार आहे? हे नराधमांचे सरकार आहे का?
- घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावे की ते नराधमाच्या बाजुने आहे की विरोधात आहेत. काल त्यांनी तिथे पोहोचायला हवे होते. पण ते रत्नागिरीमध्ये अर्धा डझन मंत्री, एसटी गाड्या घेऊन डामडौलात बसले होते. पैसे देऊन गर्दी करायची आणि रेकून रेकून भाषण ठोकायची.
- कपडे रंगेबीरंगी घालायचे, राख्या बांधून घ्यायच्या, योजनामागून योजना आणायच्या आणि जनतेच्या खऱ्या व्यथा, वेदनांकडे दुर्लक्ष करायचे. हे असंवेदनशील सरकार असून या उद्रेकामध्ये राजकारण वाटत असेल तर असे बोलणारे विकृत आहेत.
- पोलीस आयुक्त कुठे आहेत? त्यांनी सांगावे की त्यांच्यावर दबाव होता की नव्हता. खरे तर पोलीस असे वागत नाहीत, पण त्यांच्यावर दबाव आणला गेला असेल तर दबाव आणणारे आणि दबावाखाली काम करणारे पोलीस हे नराधमाएवढेच गुन्हेगार असून त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे.
- मुख्यमंत्र्यांनी एका आरोपीला दोन महिन्यांपूर्वी फाशी दिल्याचे म्हटले. त्याबद्दल एसआयटी नेमा आणि कोणाला फाशी दिली, कोणती घटना होती त्याची माहिती काढावी.
- क्षमता नसलेला माणूस मुख्यमंत्री झालेला आहे. ज्यांना फक्त जनतेच्या भावनांशी खेळता येते. गद्दारी करणारी व्यक्ती राज्यकर्ती असून राज्य करतानाही ते जनतेच्या भावनेशी गद्दारी करत आहेत.
- वामन म्हात्रेवरही सुषमा अंधारे तिथे आंदोलनाला बसल्याने गुन्हा दाखल झाला. पीडित मुलींच्या पालकांच्या तक्रारीची दखल वेळच्यावेळी घेतली असती आणि कारवाई झाली असती तर हा उद्रेक झाला नसता.