महायुतीचा आणखी एक मंत्री ‘जाणार’, उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला! रिक्षावाल्याच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न

माणिकराव कोकाटे यांच्यानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री ‘जाण्याच्या’ मार्गावर आहे, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप आणि मिंधे सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला केला.

‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मीरा-भाईंदरमधील भाजपचे महामंत्री संदीप तिवारी आणि अजित पवार गटाचे युवा अध्यक्ष आझाद पटेल यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करताना मार्गदर्शन केले.

साताऱयातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाचे नाव समोर आले, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या प्रकरणात शिंदे यांना क्लीन चिट दिली. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की, कालच एका मंत्र्याचा राजीनामा झाला. आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहे, पण मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यावर पांघरूण घालताहेत हे फार विचित्र आहे. राजकारणासाठी माणसे लागतात, पण ती माणसे कशी आहेत? ड्रग्जशी नाव जोडलेली जाणारी ती माणसे ठाण्याची आहेत, असे म्हणताच उपस्थितांमधून ‘रिक्षावाला…रिक्षावाला आणि रिक्षावाल्याचा भाऊ…’ असा आवाज आला. त्यावर, रिक्षावाल्याच्या भावाला वाचवण्याचे प्रयत्न होतायत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यात आणि देशात अंदाधुंद कारभार

उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजराती समाजाचे लोक शिवसेनेत येत आहेत. भाजप आणि अजित पवार गटाचे लोक शिवसेनेत येत आहेत. कारण राज्यात आणि देशात अंदाधुंद कारभार चालला आहे. त्याला पंटाळून लोक शिवसेनेत येत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुरावे देऊनही मुख्यमंत्री दखल घेत नाहीत

विधिमंडळ अधिवेशनात शिवसेनेने एका मंत्र्याच्या डान्सबारचे पुरावे बाहेर काढले तरी कारवाई झाली नाही. आताही साताऱयातील ड्रग्जच्या कारखान्याचे प्रकरण शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुराव्यानिशी जनतेसमोर आणले तरीही मुख्यमंत्री त्याची दखल घ्यायला तयार नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्राची मुले नशील्या पदार्थांच्या आहारी जाणार असतील तरीदेखील आपण त्या मंत्र्यांना वाचवणार आहोत का, आपल्या मुलाबाळांचे आयुष्य अशा लोकांच्या हाती देणार आहोत का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.