आता काँग्रेसव्याप्त भाजप होईल! उद्धव ठाकरे यांचा हल्ला

निवडणूक आयोग म्हणून जो लबाड बसला आहे त्याने शिवसेना, राष्ट्रवादी चोरांच्या हातात दिली, आता काँग्रेससुद्धा अशोक चव्हाणांच्या हातात देतात का ते बघूयात, लवकरच भाजपचा अध्यक्षदेखील कॉंग्रेसमधून आलेला नेता असेल, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर लगावला. भाजप भाडोत्री लोकांना पक्षात घेऊन निष्ठावंतांच्या डोक्यावर बसवत आहे, काही दिवसांपूर्वी भाजपचा नारा काँग्रेसमुक्त भारत असा होता. आता त्यांचीच परिस्थिती काँग्रेसव्याप्त भाजप होईल, असा जोरदार हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

उद्धव ठाकरे यांनी आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा झंझावाती जनसंवाद दौरा केला. गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि छत्रपती संभाजीनगर शहर येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. जनसंवादाला तुफान गर्दी उसळली. जनसंवाद सुरू असतानाच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची बातमी येऊन धडकली. चव्हाण भाजपात प्रवेश करणार अशीही चर्चा आहे. त्याचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या आणि दडपशाहीच्या राजकारणावर जोरदार प्रहार केला.

‘‘भाजपवाले रोज दंड थोपटत आहेत, परंतु बेडकुळ्या काही येत नाहीत. त्यांना बेडकुळ्या भाडय़ाने घ्याव्या लागतायत,’’ अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. अबकी बार एवढे पार, तेवढे पार असे भाजप म्हणते, मग फोडाफोडी का करतात, असा सवाल करतानाच, भाजपा चारशे नाही तर चाळीसदेखील पार करू शकणार नाही, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला. त्यासाठीच भाजपाने नितीश कुमार, अशोक चव्हाण, अजितदादा, मिंध्यांना पक्षात घेतले, त्यापेक्षा दहा वर्षे प्रामाणिकपणे काम केले असते तर भाजपवर ही वेळ आली नसती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधत असताना उपस्थितांमधून अब्दुल सत्तार चोर है… असा पुकारा झाला. याचा आधार घेत या शहराला छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानी वारसा आहे. मान कापली तरी इमान विकणार नाही असा हा कर्तबगार छावा! या शहराला गद्दारीची कीड लागली. भगव्यासोबत गद्दारी झाली. महिलांना शिव्या देणारा, जवानांच्या जमिनी हडपणारा असला सत्तार तुम्हीच वाजवा असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

प्राण्यांचा अपमान करणार नाही

कुत्रा गाडीखाली आला तरी राजीनामा मागतील. माणसाच्या जिवाची अशी पिंमत नालायकच करू शकतात. त्यांची तुलना प्राण्यांशी करून मी त्या प्राण्यांचा अपमान करणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. कार्यकर्त्याचा जीव जात असताना हे अशोक चव्हाणांशी डील करत होते, कारण तेव्हा हे बेपत्ताच होते असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, युवासेनेचे वरुण सरदेसाई आदींची उपस्थिती होती.

चोरांने, भाजपात या… आमदार-खासदार, मंत्री व्हा!

शेतकरी रोज आत्महत्या करतोय. त्याच्या घरात सत्ताधाऱ्यांना शिव्या दिल्या जात आहेत. शेतकऱयांना कोणतीही गॅरंटी नाही. पण भ्रष्टाचाऱयांनो भ्रष्टाचार करा आणि भाजपमध्ये या… आम्ही तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री-मुख्यमंत्री करू ही मोदी गॅरंटी आहे, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

– मोदी सरकारमध्ये खरोखरच हिंमत असेल तर निवडणुकीपूर्वी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्व शेतकऱयांची कर्जमुक्ती करून दाखवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

कोरोना काळात मी माझ्या महाराष्ट्राच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली होती. आता हुकूमशाहीच्या संकटातसुद्धा तशी जबाबदारी घेतली आहे. ज्यांना खोके मिळाले त्यांना ही जनसंपत्ती मिळणार नाही.
मी मुख्यमंत्री पदाची लढाई लढण्यासाठी मैदानात उतरलेलो नाही. जनतेच्या आयुष्याची लढाई लढायला मैदानात आहे. डरपोक, भेकड आणि भ्रष्ट लोकांना मी आजही सांगतोय, भाजपमध्ये जा.
तुमच्या लेखी जनता जर कुत्र्या-मांजरासारखी असेल तर मतंसुद्धा कुत्रे आणि मांजरांकडे मागा. तेव्हा कळेल, कुत्रासुद्धा तुम्हाला मत देणार नाही. कारण कुत्रा इमानदार असतो.

आदर्श घोटाळा लपवण्यासाठी की राज्यसभेची उमेदवारी?

अशोक चव्हाण हे काल-परवापर्यंत महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये, जागावाटपामध्ये हिरीरीने भाग घेत होते. आज अचानक असे काय घडले, असे आश्चर्य उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. चव्हाणांना राज्यसभेची जागा देत आहेत असे वाटतेय, आदर्श घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपमध्ये गेले असेही म्हटले जातेय. कारण 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर अजित पवार दहा दिवसांतच भाजपमध्ये गेले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हा मोदी आणि भाजपकडून शहिदांचा अपमानच!

अशोक चव्हाण यांचे भाजपशी गुफ्तगू सुरू आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडात भर सभेत अशोक चव्हाणांच्या ‘आदर्श’ घोटाळय़ाची लक्तरे टांगली होती. हा शहिदांचा अपमान असल्याचे मोदी त्यावेळेस पंठशोष करून म्हणाले होते. अशोक चव्हाणांना भाजपत घेऊन त्यांना राज्यसभेवर पाठवणार आहात का? आणि असे होणार असेल तर पंतप्रधान मोदींसह समस्त भाजप शहिदांचा अपमान करत आहे, असे आम्ही समजू असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले.

उद्धव ठाकरे यांचा दोन दिवस शिर्डी लोकसभा मतदारसंघात जनसंवाद

आज
– पब्लिक स्कूल, सोनई – सकाळी 11.30 वा.
– भगतसिंग चौक, श्रीरामपूर – दुपारी 3 वा.
– राहाता बस स्टँडसमोर – सायंकाळी 5.30 वा.

उद्या
– आंबेडकर मैदान, कोपरगाव – सकाळी 10 वा.
– संगमनेर बस स्टँडसमोर – सकाळी 11.30 वा.
– बाजारतळ, अकोले – दुपारी 1.15 वा.