मुंबईत विलेपार्ले येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार ॲड. अनिल परब यांच्यातर्फे ‘महा नोकरी’ मेळाव्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील मिंदे सरकारच्या काळातील वाढत्या बेरोजगारीवरून उद्धव ठाकरे यांनी वज्रघात केला.
शिवसेनाप्रमुखांनी शिवतीर्थावरती मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या भूमिपूत्राच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजेतच. मात्र, बाळासाहेबांची शिकवण आहे नोकऱ्या घेणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा. इतर कंपन्यांमध्ये नोकऱ्या तर घेऊच. मात्र, काही उद्योग असे सुरू करा की आपण इतरांना रोजगार देऊ शकलो पाहिजे. 1966 ते आज 2024. या सगळ्या काळात इतर पक्षांनी आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केलं? आणि शिवसेनेने काय केलं? हे मोजायचं झालं तर शिवसेनेचं कर्तृत्व हे फार मोठं आहे. आणि मला त्याचा अभिमान आहे. हिंदुत्व आणि हिंदुत्वामधलं फरक. आजचं राजकारण निवडणुका जिंकण्यासाठी चाललंय. दंगली भडकवण्यासाठी राजकारण सुरू आहे, हिंदू-मुसलामन दंगल कर, समाजा-समाजात तेढ वाढव, हे का करायचं? त्यात मारले जातात सामान्य माणसं, पकडले जातात सामान्य माणसं, पण त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. कोर्टाच्या तारीख पे तारीख लागतात. आणि त्या दंगलींचं भांडवल करून सत्ताधारी सत्ता मिळवतात. अशा वातावरणात नोकऱ्यांसाठी किंवा रोजगारासाठी सरकारच नव्हे तर शिवसेनेखेरीज कोणता पक्ष काम करतोय, हे जसं आज आम्ही सांगतोय तसं त्यांनी येऊन सांगावं, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.
पंतप्रधान ठाणे आणि मुंबईची वारी करत आहेत. आजच ते येत आहेत. हा चांगला योगायोग आहे. एका बाजूला पंतप्रधान येत आहेत ते त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला. हजार कोटी रुपयांचा प्रकल्प, तीस हजार कोटी, एक लाख कोटी, पन्नास हजार कोटी, पण कुठे जातात माहिती नाही, तरीही प्रकल्पाचं लोकार्पण. प्रकल्पही पूर्ण होत नाही. ज्या-ज्या गोष्टी पंतप्रधानांनी लोकार्पण केलं मग मुंबईचे रस्ते असतील, हे रस्ते पूर्ण झाले नाहीत. शिवस्मारक, मी स्वतः त्याला सक्षीदार आहे. जलपूजन केलं होतं, नाही झालं. कॉन्ट्रॅक्ट निघताहेत रस्त्याची कामं निघताहेत, कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरले जाताहेत. कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जाताहेत, पण सर्वसामान्यांच्या घरातील चूल पेटत नाही. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. हा मोठा फरक आहे. हा फरक लक्षात घेतल्यावर शिवसेना यांना का संपवायची आहे, हे तुम्हाला लक्षात येईल, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
आज जास्त बोलायची गरज नाही, कारण ज्यावेळेला काम बोलत असतं त्यावेळी आपण बोलायची गरज नसते. आज माझ्या शिवसेनेचं काम बोलतंय. भारतीय कामगार सेना आहे, स्थानिय लोकाधिकार समिती आहे. हजारो, लाखो युवकांना आणि युवतींना कंपन्यांमध्ये आणि ऑफिसेसमध्ये शिवसेनेमुळे रोजगार उपलब्ध झाला. मधल्या काळात जाहिराती आल्या होत्या. मराठी माणसांना इथे नो एन्ट्री… असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही. त्याची ही एक सुरुवात आहे. लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड. प्रत्येक राज्यात प्रत्येक भूमिपुत्राचा मान हा राखला गेलाच पाहिजे. नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या घोषणा होताहेत. नुसतं योजनांच्या घोषणांनी लोकांची पोटं भरत नाहीत, योजना अंमलात आणल्या पाहिजेत. आजपर्यंत गेल्या अडीच वर्षांत गद्दारी करून यांनी सरकार पाडल्यानंतर एकतरी मोठा प्रकल्प सुरू झालाय का सांगा? कोणताच नाही. उलटं आपण जे काही प्रकल्प आणले होते, आर्ध्या वाटेत होते, सामंजस्य करार झाले होते. पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणीही गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही. हे भीषण असलं तरी राज्यातलं वास्तव आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजप-मिंधे सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आसूड ओढला.
जेमतेम महिना दीड महिना राहिलेला आहे. मोदीजी आपण येताहात, आपल्याला जेवढ्या फिती कापायच्या आहेत तेवढ्या कापा. त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आज तरुण-तरुणींना रोजगार देतोय, पण दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत. पण त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही. नोकऱ्या द्या… नोकऱ्या द्या म्हणतील. उद्योगच आणले नाहीत. त्यामुळे नोकऱ्या द्या म्हटल्यावर देणार नाही. एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी गद्दारांना लगावला.
तुम्ही आज जे काही प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटता आहात, एक महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशेब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आज ज्यांना रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळाली आहे, त्यांचं अभिनंदन. लोकसंख्या आपली वाढतेय, आज जगात सगळ्या लोकसंख्येमध्ये नंबर एकचा देश आपला झालेला आहे. पण बेकारांमध्ये सुद्धा कदाचित नंबर एक असेल. लोकसंख्या वाढतेय, पण उद्योगधंद्यांचा पत्ताच नाही. रोजगार कोणीच देत नाही. त्या रोजगाराच्या संधी शिवसेना उपलब्ध करून देतेय. ज्या प्रमाणे पोलीस भरतीच्या 17 हजार पदांसाठी 17 लाख अर्ज आले होते, त्यात सुशिक्षितही होते. तशा प्रकारे सफाई कामगारांच्या नोकरीसाठीही जवळपास 46 हजार अर्ज आले होते. त्यातही पदवीधर होते. मुलगी शिकली प्रगती झाली आणि 1500 देऊन घरी बसवली, तसं आम्ही करणार नाही. शिवसेना ही न्यायहक्कासाठी आहे आणि सगळ्यांना न्यायहक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. त्याची ही सुरवात आजपासून आम्ही करतोय. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी मायबाप जनतेला केलं.