हा महाराष्ट्र पेटवण्याचासुद्धा उद्योग असू शकेल, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

आई वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटणाऱ्या बेवारस माणसाचे हे कृत्य असावे अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच हा महाराष्ट्र पेटवण्याचासुद्धा उद्योग असू शकेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईत दादरमध्ये शिवतीर्थाजवळील सौ. मीनाताई ठाकरे (माँसाहेब) यांच्या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीने रंग टाकून खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. उद्धव ठाकरे यांनी या पुतळ्याची पाहणी केली. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज जो अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे, हे करणाऱ्या दोनच वृत्ती असू शकतात. एकतर या मागे अशी व्यक्ती असू शकते ज्यांना आपल्या आई वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते अशा लावारिस, बेवारस माणसाने हे केलं असेल. आणि नाही तर बिहारमध्ये ज्या प्रमाणे मोदींजींच्या मातोश्रीचा अपमान झाला त्यामुळे बिहार बंद करण्याचा जो असफल प्रयत्न झाला, असाच कुणाचा तरी हा महाराष्ट्र पेटवण्याचासुद्धा उद्योग असू शकेल. तुर्त पोलीस या सगळ्या घटनेचा तपास करत आहेत. आम्ही सगळ्यांना शांत करण्याचे आवाहन करत आहोत. शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत, तरी आम्ही सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.