
Lok Sabha Election Results नंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विजयी खासदार ‘मातोश्री’वर भेट घेण्यासाठी दाखल होत आहेत. नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे आज मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली आणि सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांनी पक्षासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल कौतुकाची थाप दिली, मनापासून धन्यवाद दिले.
‘सगळ्यांना मनापासून धन्यवाद लढाईला आता सुरुवात झालेली आहे. ही आपली पहिली लढाई होती. त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालं आहे. हे यश तुमचं आहे, मी निमित्तमात्र आहे. तुमच्या सगळ्यांची अफाट मेहनत आणि जनतेचा आशीर्वाद या सगळ्यांचा मी ऋणी आहे. असंच प्रेम आशीर्वाद असूद्या. या आशीर्वाद आणि प्रेमाला मी कधीही दगा देणार नाही. यांना कुणी हरवू शकत नाही हा गैरसमज तुम्ही तोडला. म्हणून मी तुम्हाल धन्यवाद देतो. मी नाशिकमध्ये येणार, सर्वांना धन्यवाद देण्यासाठी राज्याभर फिरणार आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.