उल्हासनगरात धोकादायक शिव जगदंबा इमारत कोसळली

दोन वर्षांपूर्वी रिकाम्या केलेल्या अतिधोकादायक शिव जगदंबा इमारत आज कोसळली. मात्र इमारतीत कोणीच राहत नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या इमारतीच्या मागचा भाग एका घरावर पडल्याने घराला तडे गेले आहेत. तसेच एक दुचाकी मलब्याखाली गाडली गेली आहे.

महापालिकेने शहरातील एकूण 236 धोकादायक इमारती जाहीर केल्या आहेत. त्यापैकी एकूण 60 इमारती सावधगिरी म्हणून यापूर्वीच रिकाम्या केल्या आहेत. त्यातील अतिधोकादायक इमारती मशीनद्वारे जमीनदोस्त करण्याचे काम महापालिका करीत असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. दरम्यान, कॅम्प नं-3, सी ब्लॉक परिसरातील तळमजला अधिक पाच मजली शिव जगदंबा इमारत गुरुवारी रात्री कोसळली. रात्रीची वेळ असल्याने परिसरात रहदारी नव्हती. त्यात सुदैवाने इमारत रिकामी असल्याने जीवितहानी टळली.

कारवाईची प्रतीक्षा
पालिकेने एकूण 60 अतिधोकादायक व धोकादायक इमारती रिकाम्या केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक इमारती अद्ययावत मशीनद्वारे जमीनदोस्त केल्या जात आहेत, तर इतर काही इमारती कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, जगदंबा इमारतीच्या बाजूला असलेल्या घराचे या दुर्घटनेत नुकसान झाले असून घरमाल क शौकत खान यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.