कल्याण पालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळा-साहेब ठाकरे) पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. पालिकेतील गटनेत्याची निवड करण्यासाठी आज नवनियुक्त नागरसेवकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेना गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची सर्व सहमतीने निवड करण्यात आली.

कल्याण पश्चिम येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेत नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला उमेश बोरगावकर, रोहन कोट, संकेश भोईर, विशाल गारवे, नीलेश खंबायत, तेजश्री गायकवाड, वंदना महिले, अपर्णा भोईर, स्वप्नाली केणे हे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत ज्येष्ठ नगरसेवक उमेश बोरगावकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या निवडीचे अधिकृत पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी दिली.

दरम्यान, गटनेता निवडीच्या बैठकीला मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक गैरहजर होते. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या या दोन्ही नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांना पत्र दिल्याची माहिती शरद पाटील यांनी दिली.