युरियाचा काळाबाजार होत असल्याची राज्य सरकारची कबुली

राज्य सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी युरिया खताचा साठा पुरवते. त्यावर राज्य सरकार अनुदानही देते. पण या युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. सांगली जिल्ह्यात 147 मेट्रिक टन इतका अनधिकृत युरिया खताचा साठा जप्त करण्यात आला आहे.

खरीप पेरणी हंगामाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या उत्तरात शेतीच्या वापरासाठीच्या युरिया खताचा काळाबाजार होत असल्याचे अंशतः खरे असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

सांगली जिल्ह्यातील कडेगाव एमआयडीसीमधील एका प्लॉटमध्ये शेतीच्या वापरासाठी असलेल्या अनुदानित युरियाच्या गोण्यांमध्ये 67 तणांहून अधिक तसेच औद्योगिक वापरासाठी छापलेल्या गुणांमध्ये सुमारे 80 टन अनधिकृत युरिया साठा आढळून आला आहे.

या खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार सर्व युरिया खत हे शेतीच्या वापरासाठी अनुदानित खत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात एमआयडीसीच्या परिसरातील गोदामात अनेक अनधिकृत युरिया खतांचा साठा आढळून आला आहे. या युरियाच्या साठय़ाची किंमत 31 लाख 85 हजार रुपये होती तसेच गोदामामध्ये टेक्निकल ग्रेड युरियाच्या 50 किलो वजनाच्या एकूण 1 हजार 592 बॅगा ट्रकमध्ये वाहतुकीसाठी तयार असल्याचे धाड टाकली तेव्हा आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.