
रौनक दहिया व साईनाथ पारथी यांनी 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात हिंदुस्थानला दोन कांस्यपदके जिंकून दिली. आता मुलींच्या गटात अदिती कुमारी, नेहा, पुलकित व मानसी लाथेर या हिंदुस्थानी मल्लांनी अंतिम फेरी गाठून सुवर्णपदकाची लढत निश्चित केली आहे. आता या चार कुस्तीपटूंपैकी कोण कोण सुवर्णपदक जिंकणार, याकडे तमाम कुस्तीपटूंच्या नजरा असतील.
हिंदुस्थानच्या अदिती कुमारीने 43 किलो गटाच्या उपांत्य लढतीत तटस्थ कुस्तीपटू अलेक्झांड्रा बेरेजोवस्काया हिचा 8-2 गुणफरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. सुवर्णपदकाच्या लढतीत तिच्या मार्गात आता ग्रीसच्या मारिया एल. गिका हिचा अडथळा असेल. अदितीने युव्रेनची पॅरोलिन शपरिक (10-0) व मॅरिएम मोहम्मद अब्देलाल (4-2) यांचा पराभव करीत बाद फेरी गाठली होती.
57 किलो गटाच्या उपांत्य लढतीत हिंदुस्थानच्या नेहाने कझाकिस्तानच्या अन्ना स्ट्रेटन हिचा 8-4 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. आता जपानच्या सो त्सुत्सुई हिचे तिला आव्हान असेल. नेहाने एकही गुण न गमविता उपांत्य फेरी गाठली होती. तिने ग्रीकच्या मॅरी मनीला चीतपट केले, तर जॉर्जियाच्या मिरांडा कपानाडेज हिचा तांत्रिक गुणाधिक्यावर विजय मिळविला.
65 किलो गटातील उपांत्य लढतीत हिंदुस्थानच्या पुलकितने मीस्त्रच्या मरम इब्राहिम हिचा 3-0 गुण फरकाने धुव्वा उडवित आगेपूच केली. आता सुवर्णपदकाच्या लढतीत डारिया प्रोलोवा हिच्याशी पुलकितची गाठ पडेल. या हिंदुस्थानी कुस्तीपटूने चीनची लिंग वै हिला दहा गुणफरकाने अस्मान दाखविल्यानंतर जुलियाना पॅटानजारो हिचा 9-0 गुणफरकाने फडशा पाडत बाद फेरी गाठली होती. मानसी लथेरने 73 किलो गटातील उपांत्य फेरीत युव्रेनच्या ख्रिस्टीना डेमचुक हिचा 12-2 फरकाने धुव्वा उडविला. आता अंतिम लढतीत तिची गाठ हन्ना पिरस्काया हिच्याशी पडेल.