महाराष्ट्राच्या लेकी पीएचडीत आघाडीवर, उच्चशिक्षणात टक्का वाढला

उच्च शिक्षणात महिलांचा देशात सर्वाधिक टक्का असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण होत आहे. महाराष्ट्राची लेक पीएचडीतही आघाडीवर असल्याचे उघड झाले असून एका वर्षात सर्वाधिक पीएचडी मिळवणाऱ्या महिलांचे राज्य म्हणूनही महाराष्ट्राची मान उंचावली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेच्या अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर दिले.

ही अभिनास्पद बाब असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले. देशात उच्च शिक्षणात महिलांचा टक्का किती आहे, असा प्रश्न कर्नाटकचे खासदार डॉ. के. सुधाकर यांनी लोकसभेत विचारला होता. त्याला धर्मेंद्र प्रधान यांनी उत्तर दिले. त्यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या वर्षभरात 32 लाख 2 हजार 950 तरुणींनी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. यातील तीन लाख 42 हजार 43 तरुणी महाराष्ट्रातील आहेत. देशात 1 कोटी 68 लाख 19 हजार 897 विद्यार्थिनी पदवीच्या अभ्यासक्रमाला प्रविष्ट झाल्या होत्या. यातील 16 लाख 44 हजार 917 विद्यार्थिनी महाराष्ट्रातील आहेत.