
मराठी भाषेच्या पहिलीपासूनच्या सक्तीविरोधात आम्ही दोन जीआरची होळी केली. राज्यात 1985 सालानंतर चळवळ आणि राजकीय पक्ष एकत्र येण्याचे, अभूतपूर्व एकजुटीचे आजचे हे मोठे उदाहरण आहे. ही एकजूट कायम ठेवू आणि पुढील लढाई लढू, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख आणि जाहीर सभेचे निमंत्रक प्रा. दीपक पवार यांनी केले.
प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात आज जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सक्तीविरोधात स्थापन करण्यात आलेल्या शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीने या सभेचे आयोजन केले होते. हा शैक्षणिक निर्णय नाही तर राजकीय निर्णय आहे. राज्य सरकारला महाराष्ट्राची सांस्कृतिक रचना मोडून टाकायची आहे, असा सूर मान्यवरांनी लावला.
यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, शिवसेना सचिव विनायक राऊत, आमदार ज. मो. अभ्यंकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विभागप्रमुख संतोष शिंदे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, कॉम्रेड प्रकाश रेड्डी, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई, शाहीर संभाजी भगत, धर्मराज्य पक्षाचे प्रमुख राजन राजे, युवराज मोहिते, मराठी एकीकरण समितीचे प्रमुख गोवर्धन देशमुख, मराठी बोला चळवळीचे प्रमुख चंदन तहसीलदार, अभिनेता हेमंत ढोमे, माकप सचिव शैलेंद्र कांबळे, वंचित दिशा पिंकी शेख, आपचे मुकुंद किरकर, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, मनसेचे नितीन सरदेसाई, समन्वय समिती सदस्य प्रा. प्रकाश परब, आनंद भंडारी, विनोदिनी कारघळ, माधव सूर्यवंशी, राज आसनोळकर यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वसामान्य मराठी भाषाप्रेमी उपस्थित होते.