प्लेलिस्ट; गिटारची अजोड सुरावट

>> हर्षवर्धन दातार

हिंदुस्थानी चित्रपट संगीतात गिटारचा व्यापक आणि विस्तृत वापर केला जात आहे. गिटारच्या सुरावटीतील असंख्य गाण्यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. सुरावटीसोबत स्टाइल स्टेटमेंट अशी ओळख असणाऱया गिटार वाद्याचा आणि वादकांच्या कारकीर्दीचा हा आढावा.

संगीत विश्वातली दोन वाद्यं अशी आहेत की, प्रत्येकाला वाटतं, आपण ती वाजवावीत, त्यावर हुकमत मिळवावी. दोन्ही वाद्यं अशी आहेत की, ज्यातून आपलं एक स्टाईल स्टेटमेंटसुद्धा दिसतं. माऊथ ऑर्गन आणि गिटार जे प्रत्येक पार्टी, ट्रिप, स्नेहसंमेलनात हमखास हजेरी लावतं.

देव आनंद (‘बाजी’), शम्मी कपूर (‘चायना टाऊन’), ऋषी कपूर (‘हम किसी से कम नही’), आमीर खान (‘कयामत से कयामत तक’) हे प्रत्यक्ष वाजवली नाही तरी किमान गिटार वाजवण्याचा अभिनय करतात. ‘बाजी’मध्ये (1951) ‘तदबीर से बिगडी हुयी तकदीर बना ले’ गाण्यात पडद्यावर गीता बालीच्या हातात गिटार दिसते. नासीर हुसेनच्या ‘यादों की बारात’ (1973) यात तारीक आणि नासीर हुसेनचा मुलगा मन्सूर खान याच्या ‘कयामत से कयामत तक’मध्ये आमीर खान या दोघांच्या हातात इलेक्ट्रिक गिटार दिसते. पार्टी असेल आणि हातात गिटार असेल तर कल्याणजी-आनंदजी यांचे जलाल आगावर चित्रित ‘समा है सुहाना सुहाना’ (घर घर की कहानी -1970) हे गाणे आपसूक ओठांवर येते. नायिकेवर आपली वट जमविण्याकरिता नायकाच्या हातात गिटार उपयुक्त असते. गिटार हे तारा छेडून वाजवण्याचे तंतू किंवा तारवाद्य आहे. सी. रामचंद्रपासून ते नौशाद, ओ. पी. नय्यर, सपन-जगमोहन आणि भव्य वाद्यमेळाकरिता प्रसिद्ध शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल राहुल देव बर्मन आणि अलीकडचे शंकर-एहसान लॉय आणि अमित त्रिवेदीपर्यंतच्या संगीतकारांनी आपल्या गाण्यांतून गिटारचा समावेश केला आहे.

क्लासिकल किंवा स्पॅनिश, अकॉस्टिक, हवाईयन, इलेक्ट्रिक, बास, 12-स्ट्रिंग गिटार असे या वाद्याचे अनेक प्रकार आहेत. पुढे इलेक्ट्रिकमध्ये परिवर्तन झाल्यामुळे त्यातून निघणाऱया आवाजाचे वैविध्य ऐकून आपण चक्रावून जातो. सोळाव्या शतकात या वाद्याचा जन्म स्पेनमध्ये क्लासिकल गिटार या अवतारात झाला आणि पोर्तुगीजांमार्फत 19व्या शतकात गिटारचा हिंदुस्थानात प्रवेश झाला. हिंदुस्थानी चित्रपट संगीतात जर एखाद्या वाद्याचा मुबलक प्रयोग झाला असेल तर तो गिटार या वाद्याच्या अनेक रूपांतून. जगप्रसिद्ध ‘साऊंड ऑफ म्युझिक’ (1965) या चित्रपटात ‘डो-रे-मी’ ही पाश्चात्त्य संगीतातली मुळाक्षरे शिकविण्याकरिता क्लासिकल गिटार दिसते. ‘मॅकेनाज गोल्ड‘ (1969) आणि ‘एनरिओ मॉरिकोन’चे संगीत असलेले ‘द गुड बॅड अँड अग्ली’ (1966) तसेच ‘फॉर अ फ्यू डॉलर्स मोर’ (1965) या गाजलेल्या पाश्चात्त्य काऊबॉय चित्रपटातील अनेक थरकाप उडविणाऱया प्रसंगात गिटार वाद्य ऐकू येतं. कार्लोस संताना, एरिक क्लिप्टन हे जगविख्यात गिटार वादक होऊन गेले. आपल्याकडे चरणजित सिंग, बोनी डिकोस्टा, दिलीप नाईक, ब्रजभूषण काबरा, हजारा सिंग, सुनील कौशिक, रमेश अय्यर यांनी आपल्या गिटार वादनाने चित्रपट संगीत समृद्ध केलं. व्हॅन शिपले हे हिंदुस्थानचे पहिले इलेक्ट्रिक गिटारिस्ट होते. लाकडी बेसवर तारा ज्या पद्धतीने बसवल्या जातात त्या रचनेमुळे या वाद्याच्या ध्वनीला खोली असते.

गिटारचा एक वेगळा प्रकार, जी मांडीवर ठेवून वाजवली जाते ती हवाईयन किंवा लॅप स्टील गिटार. पन्नासच्या दशकात हजारा सिंग यांनी हे वाद्य आपल्याकडे आणले. यात तारांवरून स्लाईड अर्थात घासून वाजवले जाते. त्यातून आलापासारखी सलग सूरनिर्मिती होते. 1951 च्या ‘सजा’मध्ये सचिन देव बर्मननी ‘तुम ना जाने किस जहाँ मे खो गये’चे सूर ऐकू येतात. ‘एक मुसाफिर एक हसीना’ (1962) या जॉय मुखर्जी-साधना-ओ.पी. नय्यर यांच्या संगीतप्रधान चित्रपटात ‘बहोत शुक्रिया, बडी मेहेरबानी’ या मुख्यत ढोलकीचा बाज असलेल्या गाण्यात हजारा सिंग यांची हवाईयन गिटार वाजली आहे. पुढे ‘मेरे सनम’ (1965) यात ‘हुए है तुमपे आशिक हम’, कमाल अमरोही-गुलाम मोहम्मद आणि मीना कुमारीच्या ‘पाकिजा’ (1972) या शेवटच्या चित्रपटात ‘मौसम है आशिकाना’ या सर्व गाण्यात हवाईयन गिटारच्या सुरांचा समावेश आहे. मा. कृष्णराव यांच्या ‘कीचकवध’ (1959) यातील ‘धुंद मधुमती’ गाण्यात तर हवाईयन गिटारमधून मिंडसारखे (आलाप) सलग सूर वाजतात. ‘हावडा ब्रिज’ (1958) यात ‘मेरा नाम चीन-चीन-चू’ या नृत्यांगना हेलनवर चित्रित आणि गीता दत्तनी गायलेल्या अतिशय गाजलेल्या गाण्यात अगदी सुरुवातीला वाजते तीसुद्धा हवाईयन गिटार.

‘अॅन इव्हिनिंग इन पॅरिस’ (1967) यात पॅरिसचा माहौल तयार करणारे ‘रात के हमसफर’ गाण्याच्या सुरुवातीलाच शंकर-जयकिशननी बॉनी डिकोस्टाकडून अकोस्टिक गिटार वाजवून घेतली आहे. मात्र या चित्रपटातील इतर गाण्यांत दिलीप नाईक यांच्या इलेक्ट्रिक गिटारचे सूर आहेत. ‘यादों की बारात’ (1973) चित्रपटात आशा भोसले-रफी यांच्या अतिशय लोकप्रिय ‘चुरा लिया है तुमने जो दिल के’ गाण्यात सुरुवात ग्लास-चमचाच्या किणकिणाटाने (पंचमची कमाल) होते आणि नंतर गायक भूपिंदर सिंगने वाजवलेल्या 12 तारांच्या अकॉस्टिक गिटारचे पीसेस लक्षणीय आहेत. ‘चेहेरा हैं या चांद खिला’ या ‘सागर’मधील (1985) गाण्यात डिंपल कपाडियाकडे बघणाऱया ऋषी कपूरच्या हातात गिटार आहे. ही अप्रतिम सुरावट वाजवली आहे रमेश अय्यरनी. ‘जाने दो ना’ या धुंद मादक गाण्यात बास गिटार वाजवली आहे पंचम यांचे विश्वासू सहायक टोनी वाझ यांनी. ‘जमीर’ (1975) यातील ‘तुम भी चलो’ गाण्याच्या उदास प्रारूपात अमिताभ बच्चनच्या हातात अकॉस्टिक गिटार आहे. सुरुवातीचे गिटार सूर जणू ‘चलती रहे जिंदगी’ अग्रेषित करतात.

विख्यात मेंडोलिन वादक परशुराम हळदीपूर यांचे सुपुत्र अरविंद हळदीपूर हे संगीतकार राजेश रोशन यांचे सहायक. त्यांच्या बहुतेक गाण्यांत प्रामुख्याने अरविंद हळदीपूर यांची गिटार वाजली आहे. ‘ज्युली’ (1975) चित्रपटात ‘भूल गया सब कुछ’ तसेच ‘माय हार्ट इज बिटिंग’ या गाण्यातून नायिकेच्या घरचं ख्रिस्ती वातावरण गिटारमधून सुंदर उभं केलं आहे. ‘कुंवारा बाप’ (1974) या राजेश रोशन यांच्या पदार्पणाच्या चित्रपटातील गाण्यात हळदीपूर यांचीच गिटार आहे. ‘दुसरा आदमी’ (1977) यात युवा ऋषी कपूर आणि प्रौढ राखी यांच्यातील भावनिक जवळीक ‘आओ मनाये जश्ने मुहब्बत’ या गाण्यात वाजलेल्या हळदीपूर यांच्या गिटारीतून उत्तम साधली आहे. ‘क्या मौसम है’ या गाण्यात ऋषी कपूर-राखी यांच्या एकत्र येण्याला गिटारने प्रमाणित केलं आहे.

हिंदुस्थानी चित्रपट संगीतात गिटारच्या विस्तृत वापराला आणि असंख्य गाण्यांना एका लेखात सामावून घेणे शक्य नाही. आणखी काही निष्णात गिटार वादकांच्या कारकीर्दीचा आढावा पुढील भागात.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)