अवकाळीचा कहर, उन्हाळ्यात नदीला पूर! बीडमध्ये 30 ते 35 गावांत वादळाचे थैमान, उभी पिके आडवी झाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठ दिवसांपासून मराठवाडय़ात वादळी वारे, गारपीट, अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. शुक्रवारी दुपारी बेभान वारे आणि अवकाळीच्या तडाख्याने बीड, गेवराई आणि वडवणी तालुक्यातील 30 ते 35 चिमुकली गावे भेदरून गेली. अवघ्या तासभर झालेल्या पावसाने भर उन्हाळय़ात नदीला पूर आला. उभी पिके आडवी झाली. अनेक घरांवरचे पत्रे उडून गेले.

बीड जिल्हय़ात अवकाळी पावसाने आठ दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. कधी तो जिल्हय़ाच्या माथ्याशी कोसळतो, कधी पायथ्याशी. वादळी वारे, अवकाळीच्या तडाख्याने गहू, मका, ज्वारीसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला तर शेतात जागेवरच सडू लागला आहे. गारपीट आणि वादळामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. कांद्याची तर अवकाळीने पुरती वाट लावली आहे.

आजही दुपारच्या सुमारास बीड, गेवराई आणि वडवणी तालुक्यावर अचानक काळेकभिन्न आभाळ दाटून आले. क्षणार्धात सोसाटय़ाचा वारा सुरू झाला आणि बघता बघता पावसाने रौद्ररूप धारण केले. सुमारे तासभर पाऊस बेभान कोसळत होता. भर उन्हाळय़ात पावसाचे हे रूप पाहून पंचक्रोशी भेदरून गेली. वलीपूरच्या शेजारून वाहणारी नदी रोरावत वाहू लागली. पावसाचा तोराच असा होता की, पुलावरून पाणी वाहू लागले.

बीड तालुक्यातील अनेक गावांना शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला. सोसाटय़ाच्या वाऱयासह झालेल्या तासभर पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. घरांवरील पत्रे उडून गेले. झाडे कोलमडली. पीक आडवे झाले. नदी दुथडी भरून वाहू लागली.

घरांच्या दगडी भिंती पत्त्यासारख्या कोसळल्या

अवकाळी पावसाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की, घराच्या दगडी भिंती पत्त्यासारख्या कोसळल्या. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे किमान 70 ते 80 घरांवरचे पत्रे उडून गेले. जनावरांचे गोठे उद्ध्वस्त झाले. झाडे कोलमडली, उभे पीक आडवे झाले. फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले. या पंचक्रोशीतल्या शेतशिवाराचा या पावसाने जलाशयच केला. अनेक वर्षांत पहिल्यांदाच अवकाळी पावसाने असा तडाखा दिल्याचे वलीपूर, घाटजवळा, जवळा तांडा येथील ग्रामस्थांनी सांगितले.