चौकार-षटकारांची आतषबाजी, रिंकू सिंगने T-20 सामन्यात ठोकलं वादळी शतक

रिंकू सिंग नावाच वादळ गुरुवारी UP T-20 लिगमध्ये गोंगावलं आणि या वादळाच्या तडाख्यामुळे गोरखपूर लायन्स संघाचा धुरळा झाला. पराभवाच्या छायेत असलेल्या संघाला सावरून रिंकू सिंगने कर्णधार पदाला साजेशी फलंदाजी करत 48 चेंडूंमध्ये 108 धावांची तडाखेबंद खेळी केली. रिंकू सिंगच्या खेळीमुळे मेरठ मॅवरिक्स संघाने गोरखपूर लायन्स संघाचा 6 विकेटने पराभव केला.

गोरखपूरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 167 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रिंकू सिंगच्या मेरठ संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मेरठने आव्हानाचा पाठलाग करताना 8 षटकांमध्ये फक्त 38 धावा करत चार विकेट गमावल्या होत्या. एकप्रकारे सामना गोरखपूरच्या बाजूने झुकला होता. परंतु कर्णधार रिंकू सिंगने मैदानात येत चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. रिंकूने 48 चेंडूंमध्ये 225 च्या स्ट्राईक रेटने 108 धावांची तुफानी खेळी केली. या डावात त्याने 7 चौकार आणि 8 षटकारांचा पाऊस पाडला. त्याने पाचव्या विकेटसाठी साहब युवराजसोबत 130 धावांची भागी केली. या दोघांच्या संयमी फलंदाजीमुळे मेरठने हातातून निसटलेला सामना आपल्या खिशात घातला आणि 6 विकेटने गोरखपूरचा पराभव केला. आशिया चषक 2025 मध्ये रिंकू सिंहची टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात निवड झाली आहे. त्याच्या निवडीवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु रिंकूने आपल्या तोडफोड खेळीने सर्वांची बोलती बंद केली आहे.