
उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, आवरे परिसरात पाषाणातील पुरातन दुर्मिळ शिलालेख आहेत. ऐतिहासिक नोंदीत ‘गधेगळ’ नावाने ओळखले जाणारे शिल्प आणि शिलालेख जतन करण्याची आवश्यकता आहे. मात्र अंधश्रद्धेपोटी या शिलालेखांना शेंदूर फासण्याचे प्रकार वाढले आहेत. पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याची भीती आहे.
चिरनेर येथील दोन शिलालेखांपैकी एक शिलालेख श्री शंकर मंदिराच्या तळ्याकाठी अडगळीत धूळखात आहे. तर दुसरा शिलालेख चिरनेर येथीलच भैरवनाथ मंदिराच्या परिसरात शेंदूर फासलेल्या अवस्थेत असल्याची माहिती रहिवासी जीवन केणी यांनी दिली. असेच शिलालेख कळंबुसरे गावात तीन तर आवरे गावात दोन ठिकाणी आढळून आले आहेत. यापैकी काही शिलालेख शेतीच्या बांधावर, घर, मंदिर तर काही शिलालेख मंदिर परिसरात आहेत. अंधश्रद्धेतून बहुतांश शिलालेख शेंदूर फासलेल्या अवस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थ महेश भोईर यांनी दिली.
शिलालेख केवळ त्यांच्या निर्मितीचा इतिहासच सांगत नाहीत तर तेव्हाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीही कथन करतात. त्यांची पूजा करणे अशा अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा त्यांचा ऐतिहासिक वारसा म्हणून महत्त्व समजून घेणं अपेक्षित असताना पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे १० ते १६ व्या शतकातील शिलाहार राजघराण्याशी संबंधित पुरातन ठेवा अडगळीत पडला आहे.
का म्हटले जाते ‘गधेगळ’?
‘गधेगळ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक शिलालेख आणि शिल्पे तीन टप्प्यांत विभागली आहेत. वरच्या टप्प्यात चंद्र, सूर्य आणि कलश यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. मधल्या टप्प्यात मजकूर कोरलेला तर खालच्या टप्प्यात गाढव आणि महिला अशी प्रतिमा आहे. त्यामुळेच या कोरीव शिलालेखाला ‘गधेगळ’ नाव पडले असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.


























































