उरण ते मुंबई करा ‘बेस्ट’ प्रवास; द्रोणागिरी नोडमधून वांद्रे स्टेशन, वाशी, कुलाबा थेट बससेवा, विद्यार्थी, व्यापारी, कामगारांना दिलासा

उरण ते मुंबईपर्यंत आता आरामदायी ‘बेस्ट’ प्रवास करता येणार आहे. द्रोणागिरी नोड ते वांद्रे स्टेशन तसेच वाशी व कुलाबापर्यंत थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, व्यापारी व कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून कमी खर्चात हा प्रवास करता येणार आहे. या बेस्ट बस सेवेमुळे उरणहून मुंबई अधिक जवळ आली असून पर्यटकांनाही त्याचा फायदा होईल.

नवी मुंबई, उरण परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक मोठमोठे प्रकल्प येत असल्याने द्रोणागिरी नोडला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भागात औद्योगिकीकरणाला चालना मिळाली असल्याने लोकसंख्याही वाढत आहे. सध्या असलेली एसटी, नवी मुंबईची परिवहन सेवा, रेल्वे व अन्य खासगी पर्याय हे अपुरे पडत आहेत. उरणहून मुंबई गाठण्यासाठी थेट लोकल सेवा अद्यापि सुरू झालेली नाही. त्यामुळे बेस्टने सुरू केलेल्या बसला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

स्थानिकांच्या पाठपुराव्याला यश

मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही खराब हवामान, ओहोटीमुळे नेहमीच अनियमेतेच्या गर्तेत असते. उरणमधून थेट मुंबईपर्यंत प्रवासी वाहतूक करण्यासाठी बेस्टने बसेस सुरू करण्याची मागणी नागरिक व येथील काही सामाजिक संस्थांनी केली होती. बेस्टने शुक्रवारपासून द्रोणागिरी- उरण-मुंबई व नवी मुंबई मार्गावरून थेट बससेवा सुरू केली आहे. द्रोणागिरी-उरण ते बांद्रा स्टेशन पूर्व, उरण ते अटलसेतू मार्गे मुंबई, कुलाबा, उरण ते वाशी अशी बससेवा सुरू केली आहे. यामुळे प्रवासी, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.