Venezuela Bombing – युद्ध पेटले; अमेरिकेचा व्हेनेझुएलाच्या लष्करी तळांवर हल्ला; संरक्षण मंत्र्यांच्या घरावरही डागली क्षेपणास्त्रे

अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अमेरिकेनं व्हेनेझुएलाची राजधानी काराकासमध्ये मोठे हल्ले केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 2 च्या सुमारास ही कारवाई केली. या हल्ल्यात काराकास येथील प्रमुख मिलिट्री बेस आणि नेव्हीबेससह अनेक सामरिक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. पेंटागॉनच्या आदेशानुसार झालेल्या या हल्ल्यात शहरात सात मोठे स्फोट ऐकू आले. ज्यामुळे संपूर्ण परिसरात घबराट पसरली. या भीषण स्फोटांनंतर शहरात धुराचे लोट उठताना दिसले. स्काय न्यूज अरेबियाच्या दाव्यानुसार वेनेझुएलाच्या संरक्षण मंत्र्यांच्या निवासस्थानावरही हल्ला करण्यात आला आहे.

CNN च्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री 1:50 वाजता पहिला स्फोट झाला. या एका स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की लोकांच्या घराच्या खिडक्या हादरल्या. या हल्ल्यानंतर काराकासच्या अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला असून संपूर्ण शहर अंधारात आहे. आकाशात अनेक युद्धविमाने आणि हेलिकॉप्टर उडताना दिसल्याने लोक जीवाच्या भीतीने घराबाहेर पडले आणि रस्त्यावर जमा झाले. व्हेनेझुएला सरकारने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र शहरात तणावाचे वातावरण आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प  यांनी आधीच दिला होता इशारा
या हल्ल्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेनेझुएलाला अनेकदा कडक इशारा दिला होता. व्हेनेझुएलामधील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे नष्ट करण्यासाठी अमेरिका मोठी कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. ऑक्टोबरमध्ये ट्रम्प यांनी सीआयएला (CIA) व्हेनेझुएलामध्ये गुप्त मोहिमा राबवण्याची परवानगी दिली होती, जेणेकरून अवैध अंमली पदार्थ आणि स्थलांतरितांच्या ओघावर नियंत्रण मिळवता येईल. व्हाइट हाऊसकडून या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, मात्र या कारवाईने दोन्ही देशांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे.