
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान शाहिन्स आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील दुसरा वन डे क्रिकेट सामना रद्द करण्यात आला आहे. हा सामना रविवारी अबूधाबी येथे खेळवला जाणार होता, मात्र तेथील बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या (पीसीबी) अधिकाऱयांनी सामना रद्द झाल्याची पुष्टी केली आहे. सर्व खेळाडू आणि संघ अधिकारी यांना हॉटेलमध्येच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सराव सत्रही रद्द करण्यात आले आहे.
इंग्लंड बोर्डाच्या सल्ल्यानंतर निर्णय
हा निर्णय इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डच्या (ईसीबी) सल्ल्यानुसार घेण्यात आल्याचे ‘पीसीबी’ने स्पष्ट केले. खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱयांची सुरक्षा ही सर्वोच्च प्राधान्य असल्याचे दोन्ही बोर्डांनी म्हटले आहे.
मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र पुन्हा सुरू झाल्यानंतर मालिकेच्या भवितव्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार शाहिन्स संघाला पाकिस्तानात परत बोलवायचे की उर्वरित सामने खेळवायचे, हे ठरवले जाईल.
जॉनी बेअरस्टोची मदतीची विनंती
इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो अबूधाबी येथे मेंटॉरच्या भूमिकेत संघासोबत उपस्थित आहे. त्याने यूकेचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याकडे सोशल मीडियावरून मदतीची विनंती केली. ‘आम्हाला घरी पोहोचवू शकता का?’ असा संदेश त्याने एका व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना लिहिला असून तो व्हायरल झाला आहे.
एशियन चॅम्पियन्स लीगचे सामनेही स्थगित
या तणावाचा परिणाम इतर क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. एएफसीने एशियन चॅम्पियन्स लीग एलिटमधील सामने पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. .



























































