तिसऱ्या महायुद्धाची भीती; अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले, खामेनींनी काही तासांतच बदला घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लढाऊ जहाजे व विमानांसह गेल्या अनेक दिवसांपासून घात लावून बसलेल्या अमेरिकेने आज अखेर इराणवर जोरदार हल्ला चढवला. इराणचे लष्करी मुख्यालय व इतर पायाभूत यंत्रणांना लक्ष्य करत एका मागोमाग एक घातक क्षेपणास्त्रे डागली. इस्रायलनेही अमेरिकेला साथ देत इराणची राजधानी तेहराणसह अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव केला. या हल्ल्यात इराणचे संरक्षणमंत्री आणि इराणी लष्कराच्या कमांडरसह 70 हून अधिक लोक मारले गेले. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली. इराणने अवघ्या काही तासांतच या हल्ल्याचा बदला घेतला. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्वच्या सर्व तळांवर जबरदस्त हवाई हल्ले चढवत अमेरिकेला तळ आणि मुळापासून हादरवून टाकले. त्यामुळे संपूर्ण आखातात हाहाकार उडाला असून संपूर्ण जगावर तिसऱया महायुद्धाचे ढग दाटले आहेत.

इराण आणि अमेरिकेचा संघर्ष जुनाच आहे. इराण हा अण्वस्त्रसंपन्न बनण्यासाठी प्रयत्नशील असून त्यामुळे जगाला धोका आहे, असा अमेरिकेचा आक्षेप आहे. इराणने हा प्रयत्न सोडून अण्वस्त्रबंदी करारावर सही करावी, असा अमेरिकेचा आग्रह आहे. काही महिन्यांपूर्वी याच उद्देशाने इस्रायल व अमेरिकेने इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केले होते, मात्र संघर्ष थांबल्यावर इराणने पुन्हा अणुप्रकल्पांचे काम सुरू केले. त्यामुळे पुन्हा तणाव वाढला. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका व इराणमध्ये या मुद्दय़ावर वाटाघाटी सुरू होत्या. अणुकराराबरोबरच इराणने हाती घेतलेला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रकल्प हा वादाचा प्रमुख मुद्दा होता. इराणने त्यावर तडजोड करण्यास नकार दिल्याने अमेरिकेने आज थेट लष्करी कारवाई केली.

शाळेवर पडले मिसाईल

अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यात इराणमध्ये मोठी जीवितहानी झाली. इराण सरकारच्या माहितीनुसार, अमेरिका-इस्रायलने डागलेले मिसाईल मुलींच्या शाळेवर पडून त्यात 53 जणांचा मृत्यू झाला, तर 45 जखमी झाले आहेत. मृत व जखमींमध्ये लहान मुलींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचाही समावेश आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणी लष्कराच्या एका टॉप कमांडरचाही मृत्यू झाला.

खामेनी यांना तेहरानबाहेर हलवले!

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी, इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान व अन्य लष्करी कमांडर हे अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्याचे मुख्य लक्ष्य होते, मात्र इराणने आधीच खबरदारी घेतली होती. खामेनी यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांना राजधानी तेहरानमधून हलवण्यात आले होते. त्यामुळे ते सुखरूप असल्याचे समजते.

गरज पडेल तोपर्यंत हल्ले करू – नेतन्याहू

इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी या मोहिमेला ‘सिंहगर्जना’ असे नाव दिले असून इराणला इशारा दिला आहे. ‘गरज पडेल तोपर्यंत हे हल्ले सुरू राहतील,’ असे नेतन्याहू म्हणाले, तर इराणी जनतेने जुलूमशाहीचे जोखड फेकून देऊन एक स्वतंत्र आणि शांततापूर्ण इराण अस्तित्वात आणावा, असे ते म्हणाले. ऐतिहासिक नेतृत्वाबद्दल नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे आभारही मानले.

इस्रायलमध्ये आणीबाणीची घोषणा

इराणच्या प्रतिहल्ल्यानंतर इस्रायलने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. शाळा, कार्यालये व सार्वजनिक कार्यक्रम शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. देशाला असलेला धोका नष्ट करण्यासाठी हा हल्ला केल्याचे नेतन्याहू सरकारने स्पष्ट केले आहे.

इराणचे आखातात 8 ठिकाणी हल्ले

अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशातील अमेरिकेच्या आठ तळांना लक्ष्य केले. सौदी अरब, कतार, कुवेत, बहरीन, अबुधाबी, दुबई, इराक आणि जॉर्डन येथे इराणने हवाई हल्ले केले. कतारचा अल उदैद हवाई तळ, कुवेतमधील अल सालेम हवाई तळ, यूएईचा अल धाफरा आणि बहरीनमधील यूएस फिफ्थ फ्लीट तळ इराणने उडवला.

हिंदुस्थानींना आवाहन

युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराण व इस्रायलमधील हिंदुस्थानी दूतावासांनी हिंदुस्थानी नागरिकांना आवाहन केले आहे. ‘सर्व हिंदुस्थानी नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. स्थानिक सरकारच्या सूचनांचे पालन करावे व सुरक्षित स्थळी राहावे. अतिमहत्त्वाच्या कामांव्यतिरिक्त प्रवास करू नये, असा सल्ला दिला आहे.

अमेरिकेच्या इराणला अटी

  •  अण्वस्त्र निर्मिती थांबवा
  •  बॅलिस्टिक मिसाईल निर्मिती बंद करा
  •  युरेनियमचा साठा कमी करा
  •  हमास, हुती बंडखोरांना पाठिंबा देणे बंद करा

दुबईत घबराट, बुर्ज खलिफा रिकामी

आखातातील अमेरिकी तळांना लक्ष्य करताना इराणने आज विशेषतः दुबई आणि अबुधाबीला लक्ष्य केले. दुबईतील ‘फेअरमन्ट द पाम’ या हॉटेलवर इराणने क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे घबराट उडाली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा ही इमारत रिकामी करण्यात आली. तेथील पर्यटक व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. दुबईत इराणने केलेल्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, दुबईने नागरी उड्डाणे बंद केल्याने विदेशातील शेकडो नागरिक तिथेच अडकले आहेत. यात प्रसिद्ध बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिचाही समावेश आहे. ती ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेसाठी चालली होती.

‘इराणी लष्करापुढं दोनच मार्ग आहेत. त्यांनी एकतर शस्त्रं खाली ठेवावीत किंवा विनाश ओढवून घ्यावा. – डोनाल्ड ट्रम्प

आठ देशांच्या हवाई हद्दी बंद

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये पेटलेल्या युद्धानंतर आशिया व आखातातील आठ देशांनी आपल्या हवाई हद्दी बंद केल्या आहेत. एअर इंडियाने मध्य पूर्वेकडील देशात जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत, तर इस्रायलनेही त्यांची हवाई हद्द बंद केली आहे.