
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अवैध स्थलांतरितांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने वेगवेगळे निर्णय घेत आहेत. आता पुन्हा एकदा प्रशासनाने बेकायदेशीररीत्या देशात राहणाऱ्या स्थलांतरितांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. स्वेच्छेने मायदेशी परतणाऱ्यांना आर्थिक मदतीसह मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) ‘प्रोजेक्ट होमकमिंग’ (Project Homecoming) नावाचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश बेकायदेशीर स्थलांतरितांना जबरदस्तीने हद्दपार करण्याऐवजी, त्यांना सन्मानाने आणि स्वतःहून देश सोडण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.
You can go home with a fresh start!
Receive a FREE flight home and a $2,600 exit bonus when you use CBP Home to self-deport: https://t.co/YGo3uuNvrE pic.twitter.com/ZdSBlrJryO
— Homeland Security (@DHSgov) March 17, 2026
ट्रम्प यांच्या या योजनेअंतर्गत, जे नागरिक कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहत आहेत, त्यांना त्यांच्या मायदेशी जाण्यासाठी विमानाचे तिकीट मोफत दिले जाईल. यासोबतच, देश सोडणाऱ्या व्यक्तीला 2,600 डॉलर्सचा ( म्हणजे सुमारे 2.15लाख रुपये) ‘एक्झिट बोनस’ देखील दिला जाणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्यांवर यापूर्वी असलेले दंड किंवा कायदेशीर निर्बंधही काढले जातील. यामुळे भविष्यात त्यांना पुन्हा अमेरिकेत येण्याची संधी उपलब्ध राहू शकेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांना ‘CBP Home’ या मोबाईल ॲपद्वारे अर्ज करावा लागेल. अर्जाची पडताळणी केल्यानंतर संबंधित व्यक्ती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसल्याचा तपास केलाजाईल. देश सोडण्याची परवानगी मिळाली की, संबंधित व्यक्तीला आपली नोकरी, मुलांचे शिक्षण आणि इतर वैयक्तिक कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. या काळात त्यांच्यावर इमिग्रेशन विभागाकडून कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही.
गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ज्या लोकांनी बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश केला आहे त्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःहून मायदेशी परतणे हिताचे ठरेल. जे नागरिक या योजनेचा लाभ घेणार नाहीत, त्यांना अटक, दंड आणि कायमस्वरूपी हद्दपारीचा सामना करावा लागेल, असे त्यांनी सांगितले आहे.



























































