7 मे रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव ठेवले ‘सिंदूर’

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना लक्ष्य केले. 7 मे रोजी लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांवर हल्ले चढवले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील जोडप्याने या दिवशी जन्मलेल्या आपल्या बाळाचे नाव सिंदूर ठेवण्याचा निर्णय घेतला. सोनी कनोजिया यांनी 7 मे रोजी मुलाला जन्म दिला. लष्कराच्या शौर्याने प्रेरित होऊन त्यांनी आणि त्यांचे पती राहुल कनोजिया यांनी मुलाचे नाव सिंदूर असे ठेवले. बाळाचे बाबा राहुल कनोजिया म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान आमच्या सैन्याने दाखवलेल्या धैर्याने मी प्रभावित झालो. त्यांचे शौर्य, बलिदानाच्या सन्मानार्थ आमच्या मुलाचे नाव सिंदूर ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने मोठा होऊन देशाची सेवा करावी अशी इच्छा आहे.