ट्रेंड – आंब्याची लूटमार जोरदार…

आपण लूटमारीच्या अनेक घटनांविषयी ऐकतो. पैसे, मौल्यवान वस्तूंची लूटमार होत असते. सध्या मात्र लूटमारीची एक हटके घटना व्हायरल होतेय. ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये घडली आहे. लखनऊ येथे राज्य सरकारने आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते. या आंबा महोत्सवात जगभरातील वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. आंबा महोत्सवाची सांगता होताच तिथे एक भलतीच घटना घडली. आंबा महोत्सवाचा समारोप जाहीर होताच शेकडो लोक प्रदर्शनात ठेवलेल्या आंब्यांवर अक्षरशः तुटून पडले. लोकांनी प्रदर्शनात ठेवलेले सर्व आंबे लुटून नेले. आंब्याच्या लुटीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये लोक प्रदर्शनात ठेवलेले सर्व आंबे लुटताना दिसत आहेत. त्यांनी आंब्यांनी भरलेले सर्व टेबल काही सेकंदांत रिकामे केले. महिला, मुले. वृद्धांनी आंबे पळवून नेले.