वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात संघर्ष पुन्हा धगधगला; गुपचूप सुरू झालेला ड्रोन सर्व्हे ग्रामस्थांनी बंद पाडला

वाढवण बंदर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांचा संघर्ष पुन्हा पेट घेत असून या प्रकल्पाविरोधातील रोष बुधवारी सकाळी उफाळून आला. जेएनपीए (JNPA) कडून वाढवण समुद्र किनारी सुरू करण्यात आलेला ड्रोन सर्व्हे ग्रामस्थांच्या तीव्र आणि एकसंघ विरोधामुळे थांबवावा लागला. कोणतीही पूर्वसूचना न देता खासगी कंपनीकडून चोरीछुपे सुरू झालेल्या या सर्व्हेच्या विरोधात ग्रामस्थांनी जोरदार निषेध करत हे लोकशाही व्यवस्थेचे सरळसरळ उल्लंघन असल्याचा आरोप केला.

ITDCG या खासगी कंपनीकडून बुधवारी (दि. २५ जून) सकाळच्या सुमारास वाढवण समुद्रकिनारी ड्रोनद्वारे हाईटाईड लाटांचा (उंच भरती) अभ्यास करण्याचा प्रयत्न सुरू झाला. या कामाची जबाबदारी JNPA ने ITDCG या कंपनीकडे सोपवली आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायतीला कोणतीही अधिकृत माहिती दिली नसताना व स्थानिक जनतेला विश्वासात न घेता सुरू करण्यात आलेल्या या सर्व्हेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हा सर्व्हे रोखला.

माणगावमधील तीस एकर जमिनीवर क्रशरमाफियांचा कब्जा, करार संपूनही बेकायदा खडी क्रशिंग डांबर; आरएमसी प्लांटही थाटला

सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आहे, असे पोलिसांनी खोटेच सांगितले. वाढवण विरोधी संघर्ष समिती, युवा संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येत या सर्वेक्षणाला आक्रमक विरोध केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनीच दिशाभूल केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. पोलिसांनी “सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे” असे खोटे सांगून ग्रामस्थांची फसवणूक केली, असा आरोप ग्रामस्थांनी केला.