
नवविवाहित सुनेचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येसा प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका प्रणाली माने आणि त्यांचा मुलगा आर्य मानेला तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत ही मागणी केली आहे. तसेच प्रणाली माने यांचे पती मिलिंद माने यांची देखील चौकशी करा, असे वैभव नाईक म्हणाले.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे सावंतवाडी माठेवाडा निर्माण प्लाझा येथे नवविवाहिता प्रिया माने हिचा मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. याप्रकरणी प्रियाची सासू आणि देवगडच्या भाजपच्या नगरसेविका प्रिया मानेंसह त्यांचा मुलगा आर्य माने यांच्याविरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रिया हिचे वडील विलास तावडे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दिली आहे.
प्रणाली माने या भाजप पक्षाच्या देवगड नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका असल्याने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे. यामुळे प्रणाली माने आणि आर्य माने यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. तसेच या प्रकरणात प्रणाली माने यांच्या पतीचीही चौकशी करावी. घटनेनंतर प्रकरण मिटवण्यासाठी माने कुटुंबीयांनी कुणाकुणाला फोन केले त्याचे सीडीआर तपासावेत. प्रिया चव्हाण यांना मारहाण झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
प्रियाच्या आत्महत्येआधी घटनास्थळावर कोण कोण आले? कोणाच्या गाड्या आल्या? याचा सीसीटीव्ही कुठे तपास करावा. प्रियाच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षतीपणे या प्रकरणाची चौकशी करावी. प्रणाली माने आणि आर्य माने यांना तत्काळ अटक करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, देवगड तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, महिला तालुका प्रमुख हर्षा ठाकूर, नगरसेवक विशाल मांजरेकर, विभाग प्रमुख विकास कोयंडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.