
इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, राशीद खान, प्रसिद्ध कृष्णा अशा दिग्गज गोलंदाजांची तगडी फौज समोर असताना 14 वर्षांच्या वैभवने पहिल्या चेंडूपासूनच एखाद्या अनुभवी खेळाडूसारखी फटकेबाजी सुरू केली. फटाक्यांच्या आतषबाजीसारखी चौफेर फटकेबाजी करत त्याने सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. त्याने 35 चेंडूंमध्ये शतकं ठोकलं आणि इतिहास रचला. IPL च्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर होण्याचा बहुमान त्याने आपल्या नावावार केला आहे. त्याच्या या पराक्रमामुळे वैभव सूर्यवंशीच्या वडिलांनी दिवाळी 6 महिने लवकर आली, असं म्हणत आपला आनंद व्यक्त केला आहे.
वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी हे सुद्धा क्रिकेटप्रेमी आहेत. बॉर्डर गावस्कर करंडक 2020-21 मध्ये शुभमन गिलने ऑस्ट्रेलियातील गब्बा स्टेडियमवर 91 धावांची दमदार खेळी केली होती. तेव्हा वर्तमानपत्रांमध्ये शुभमन गिल आणि त्याच्या वडिलांची जोरदार चर्चा झाली होती. त्याचबरोबर सिमेंटच्या पिचवर त्याला ट्रेनिंग देण्यात आल्याचं संजीव सूर्यवंशी यांनी वर्तमानपत्रांमध्ये वाचलं होतं. त्यानंतर त्यांनी सुद्धा तशाच पद्धतीचे पीच तयार केले आणि वैभवकडून सराव करुन घेतला. “वैभवने 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले आणि राजस्थानला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडली. त्याच्या खेळीमुळे आम्हाला आनंद झाला असून घरात उत्सवाचे वातावरण आहे”, असे संजीव सूर्यवंशी म्हणाले. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.