14 वर्षांच्या तुफानाला ‘संरक्षण कवच’, हिंदुस्थानचे ‘वैभव’ जपण्यासाठी राजस्थानची खास रणनीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या क्रिकेटचे उज्ज्वल भवितव्य मानला जाणारा वैभव सूर्यवंशी हा केवळ एक खेळाडू नाही, तर एक अमूल्य ठेवा आहे. हिंदुस्थानी क्रिकेटची संपत्ती आहे. पण याच ठेव्याला माध्यमांच्या झगमगाटात हरवू न देण्यासाठी राजस्थान रॉयल्सने आता कडक पावले उचलली आहेत. अल्पवयात मिळालेली अफाट प्रसिद्धी त्याच्या बालमनावर परिणाम करू नये, त्याची वाट चुकू नये यासाठी संघाने खास रणनीती आखत त्याला पूर्णपणे संरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अवघ्या 14 व्या वर्षीच वैभवने आपल्या घणाघाती फलंदाजीने क्रिकेट विश्व हादरवले. गेल्या मोसमात आयपीएलमध्ये 35 चेंडूंत शतक झळकावत त्याने इतिहास घडवला, तर 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 175 धावांची तुफानी खेळी करून हिंदुस्थानला विजेतेपद मिळवून दिले. त्याच्या फटक्यांची धार पाहून अवघं जग थक्क झाले आहे. मात्र, दुसरा हंगाम ही वैभवसाठी खरी कसोटी मानली जाते. विरोधी संघांनी त्याच्या खेळाचा अभ्यास सुरू केला असून त्याला रोखण्यासाठी रणनीती आखल्या जात आहेत. अशा वेळी त्याला मानसिकष्टय़ा स्थिर ठेवणे हीच संघाची प्राथमिकता आहे.

कर्णधार रियान परागने स्पष्ट सांगितले की, वैभव केवळ खेळावर लक्ष देईल. पत्रकार परिषद, मुलाखती यापासून त्याला दूर ठेवले जाईल. यशस्वी जैसवाल नेतृत्व सांभाळणार असून कुमार संगकारा यांचे मार्गदर्शन त्याला दिशा देणार आहे. हिंदुस्थानचा हा ‘हिरा’ पुढील अनेक वर्षे चमकत राहावा यासाठी राजस्थान आता कवच बनून उभा राहिला आहे. या झगमगाटापासून वैभव दूर राहिला तर यंदाची आयपीएल त्याच्या फटक्यांच्या आतषबाजीसाठी ओळखली जाईल, असा विश्वास राजस्थानच्या संघव्यवस्थापनाला आहे.