वैष्णवी हगवणे प्रकरणात सहा दिवसांनंतर सरकारला जाग; सासरा राजेंद्र, दीर सुशील अद्याप फरारच

दोन कोटी रुपये माहेरहून आणावे यासाठी सासरच्यांकडून सतत होणारी मारहाण आणि मानसिक छळामुळे वैष्णवी शशांक हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यानंतर राज्यातील महायुती सरकारला सहा दिवसांनी जाग आली आहे. सहा दिवसांपासून गायब असलेले वैष्णवीचे दहा महिन्यांचे बाळ गुरुवारी तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी फोनवर कस्पटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, या प्रकरणातील फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत.दरम्यान, या प्रकरणात सविस्तर चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले, मी सांगतो का असे कर म्हणून

बारामती येथे सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाचे अनेक कार्यकर्ते लग्न समारंभाला बोलवतात. वेळ असल्यास अशा कार्यक्रमांना जातो. आता एखाद्या लग्नाला मी गेलो आणि त्याने त्याच्या सुनेला काय वेडेवाकडे केले तर अजित पवारचा काय संबंध आहे? मी सांगतो का असे कर म्हणून.