
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसबाहेर बुधवारी सकाळी एक मोठी सुरक्षा दुर्घटना घडली. एका वेगाने आलेल्या व्हॅनने व्हाईट हाऊसच्या सुरक्षा बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली आणि आत शिरली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने (US Secret Service) तत्काळ कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी सकाळी ६:३७ च्या सुमारास घडली. कनेक्टिकट अव्हेन्यू आणि एच स्ट्रीट जवळील सुरक्षा बॅरिकेड्सला एका व्हॅनने धडक दिली आणि आत शिरली. या धडकेचा आवाज येताच तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने हालचाल करत व्हॅनला घेरले आणि चालकाला अटक केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही.
सीक्रेट सर्व्हिसने दिलेल्या निवेदनानुसार, संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील रस्ते काही काळ बंद करण्यात आले होते. बॉम्ब शोधक पथकाने व्हॅनची तपासणी केली असता, त्यात कोणतेही धोकादायक साहित्य आढळले नाही. ही धडक अपघाती होती की जाणीवपूर्वक दिलेली, याचा तपास सध्या पोलीस आणि सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी करत आहेत.
























































