आता प्रत्येक गोष्टीसाठी भाजपची परवानगी घ्यायची का? वंदे भारत ट्रेनमध्ये नॉनव्हेज पदार्थांच्या बंदीवरून तृणमूलचा सवाल

पश्चिम बंगाल आणि आसाम दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या मेनूमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांना फक्त व्हेज अन्न पदार्थ दिले जात असून नॉनव्हेजचा पर्याय वगळण्यात आला आहे. त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. यावरून तृणमूल काँग्रेसने (TMC) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे. आधी त्यांनी आमच्या मतांवर पहारा दिला आणि आता ते आमच्या ताटावर (जेवणावर) पहारा देत आहेत,” अशा शब्दांत तृणमूल काँग्नेसने सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच उद्घाटन केलेल्या या वंदे भारत रेल्वेमध्ये मासे आणि मांस उपलब्ध नसल्याचा मुद्दा तृणमूलने लावून धरला आहे. बंगाल ते आसाम दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनमध्ये बंगाली संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले मासे का वगळले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावर भारतीय रेल्वेने स्पष्टीकरण दिले की, ही ट्रेन ‘मां कामाख्या’ आणि ‘मां काली’ या दोन अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांना जोडते. त्यामुळे धार्मिक पावित्र्य राखून प्रवाशांना केवळ ‘सात्त्विक’ आणि शुद्ध शाकाहारी जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र, तृणमूल काँग्रेसने हा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. शक्तीपीठांमध्ये, विशेषतः कामाख्या आणि काली मातेच्या पूजेत गेल्या अनेक शतकांपासून मांसाहारी नैवेद्याची परंपरा असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी मासे खाणाऱ्या बंगाली लोकांची तुलना ‘मुघलां’शी केल्याचा आरोपही तृणमूलने केला आहे. हा निर्णय केवळ खाण्यापुरता मर्यादित नसून भाजप लोकांच्या जगण्याच्या पद्धतीवर नियंत्रण मिळवू पाहत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.