
महिला दिनानिमित्त शिवसेना वरळी विधानसभेच्यावतीने ‘पैठणीचा खेळ रंगे दादुसच्या संगे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता वरळीच्या जांबोरी मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे. दादुस ऊर्फ संतोष चौधरी याचा लाइव्ह ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आकर्षण असून या वेळी 18 भाग्यवान महिलांना मानाची पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. आमदार सुनील शिंदे आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.
शाहीर सीमा पाटील यांना पुरस्कार
दिल्लीच्या ‘उडान’ संस्थेतर्फे दिला जाणारा ‘माता रमाई आंबेडकर पुरस्कार’ शाहीर सीमा पाटील यांना जाहीर झाला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त उद्या, शनिवारी नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पेंद्रात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
दादरमध्ये शिवप्रताप नाट्यप्रयोग
अखिल भारतीय महिला मराठा महासंघातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून 10 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे 45 महिला कलाकारांनी साकारलेल्या ‘शिवप्रताप’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.
जाणीव उद्याची स्त्री मनाची
मनातली जाणीव, निनाद प्रकाशन आणि सोनल खानोलकर यांच्यावतीने ‘जाणीव उद्याची – स्त्री मनाची’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवार 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजता दादरच्या छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, महिलांच्या कलांचे सादरीकरण, लकी ड्रॉ असे कार्यक्रम या वेळी पार पडतील.
तीन विवाहपूर्व संवाद केंद्रांचे उद्घाटन
राष्ट्रीय महिला आयोग व मुंबई पालिकेच्या सहकार्याने भारतीय स्त्री शक्तीतर्फे मुंबईमध्ये परळ, विलेपार्ले आणि बोरिवली अशा तीन ठिकाणी ‘विवाहपूर्व संवाद’ केंद्रे सुरू होत आहेत. उद्या या केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. कौटुंबिक न्यायालयात नवदाम्पत्यांच्या वादाच्या व घटस्फोटाच्या खटल्यांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. त्याला आळा घालण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत भारतीय स्त्री शक्तीतर्फे ‘कुटुंब सल्ला केंद्र’ तसेच ‘विवाह पूर्व मार्गदर्शन कार्यशाळा’ असे अनेक उपक्रम राबविले जातात, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकारी सीमा देशपांडे यांनी दिली.