
>> वर्णिका काकडे
ही मराठी भाषेची एक बोलीभाषा आहे, जी प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ (उदा. अमरावती, अकोला, बुलढाणा) भागातील ग्रामीण लोकांमध्ये बोलली जाते आणि या बोलीचा संबंध वऱ्हाडी बोलीशी जोडला जातो, ज्यात अनेकदा खान्देशी बोलीचाही प्रभाव दिसतो, विशेषत जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा व जामनेर तालुक्यात अजिंठा डोंगररांगांकडील प्रदेशात, भुसावळ, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे.
तावडी बोलीत मोठ्या प्रमाणात `क’ च्या जागी `ख’चा उच्चार केला जातो. उदाहरणार्थ- डोखं (डोकं), मोखा (मोका). बहिणाबाई चौधरींच्या कवितांमधून तावडी बोलीचा आविष्कार दिसतो. पूर्वी या बोलीला अहिराणी समजत असत, परंतु नवीन विचारानुसार ही स्वतंत्र बोली मानली गेली.
उच्चार प्रक्रिये लघुत्तम रूप वापरण्यावर तावडीचा भर आहे. अर्थात भाषिक काटकसर असंही आपण म्हणू शकतो. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय व्यक्त करण्याकडे तावडी बोलीचा कल आहे. जसे आल्ता(आला होता), गेल्ता (गेला होता), कुढलोंग (कुठपर्यंत), कव्हाचा (केव्हापासूनचा), तढ़लोंग (तिथपर्यंत), आढलोंग (इथपर्यंत), पहाल्ता (पाहिला होता), राहल्ता (राहिला होता), झाल्ता (झाला होता) इत्यादी. तावडी बोलीतही स्वतंत्र म्हणी आणि वाक्प्रचार आहेत.
या भाषेला स्वत:चे सौष्ठव आहे. गोडवा आहे. शब्दांमध्ये नाद आहे, लय आहे. खास लहेजा आहे. तिला व्याकरण आहे. महानुभाव पंथाच्या काळात (12 व्या शतकात) या बोलीची मुळे आढळतात. तावडी बोली आणि लेवा बोली यांच्यात एक धुसर अशी रेषा आहे. जी दोघांना वेगळी करते. इतर भाषिकांना हा फरत लक्षातही येणार नाही इतका सूक्ष्म आहे.
मराठी भाषेतील बोलीभाषांच्या समृद्धीचा भाग म्हणून या बोलीकडे पाहिले जाते. या बोलीभाषेच्या विकासासाठी आणि प्रचारासाठी कार्पाम आयोजित केले जातात. तावडी बोली भाषेचे पहिले महाराष्ट्र राज्यस्तरीय साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर येथे 30 डिसेंबर 2018 रोजी भरले होते, ज्येष्ठ साहित्यिक गो.तु. पाटील संमेलनाध्यक्ष होते. तसेच तावडी बोलीतून
डॉ. अशोक कोळी संशोधनात्मक कार्य करत असून त्यांची कथा, कादंबरी, कविता, बालकविता, समिक्षा या प्रकारात लेखन केले आहे.


























































