
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, पण आजही सामान्य मुंबईकरांना चोवीस तास पाणी मिळू शकत नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निःक्षारीकरणाचा अतिशय चांगला प्रकल्प आखण्यात आला होता. या प्रकल्पासाठी मनोरीत जागाही निश्चित केली होती. पण सरकार बदलल्यानंतर प्रकल्प बाजूला ठेवला. आता गारगाई धरणाचा प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पातून फक्त 400 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे, पण तरीही गारगाईच्या प्रकल्पाचा अट्टहास का, असा सवाल शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी आज विधानसभेत केला.
अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी मुंबईचा पाणी प्रश्न, प्रदूषण, ढासळलेला हवेचा निर्देशांक यावर भाष्य केले.
राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईला नक्की काय मिळाले हा माझ्या मनात प्रश्न आहे. असे सांगून ते म्हणाले की, या बजेटमध्ये मुंबईला काही मिळाले नाही. मुंबईतील खराब झालेले हवामान हा अतिशय चिंतेचा विषय आहे. या संदर्भात बजेटमध्ये कोणत्याही उपाययोजनांचा उल्लेख नाही. खराब हवामान आणि ढासळलेला हवेचा निर्देशांक या संदर्भात गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आजच्या घडीला 100 मीटरपेक्षा अधिक समोरचे दिसत नाही. वयोवृद्ध किंवा लहान मुले यांना श्वसनाचे विकार होत आहेत. संसर्गजन्य आजारांवर सरकार गंभीर नाही.
राज्याच्या बजेटमध्ये गारगाई धरणाचा उल्लेख असल्याचे सांगून ते म्हणाले की, गारगाई धरण पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल, किती खर्च होईल याचा काही उल्लेख बजेटमध्ये नाही. हे सर्व केल्यावर आपल्याला दररोज चारशे दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. मोदी सरकार सौर उैर्जेवर भर देते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सौर उैर्जेवरील निःक्षारणीकरणाचा प्रकल्प आखला होता. त्याचा खर्च अत्यंत कमी होता, पण दुर्दैवाने आमचे सरकार गेले आणि हा प्रकल्प बाजूला टाकण्यात आला, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मेट्रोचे नियोजन फसले
मेट्रो प्रकल्प चांगले आहेत. पण मेट्रोची आखणी फसल्याचे त्यांनी सांगितले. अंधेरीला दोन मेट्रो रेल्वे केल्या. पण मेट्रोच्या एका मार्गावरून दुसऱया मार्गावर जायचे असेल तर सदैव वर्दळीचा पश्चिम द्रुतगती महामार्ग पार करावा लागतो. बीकेसीतील मेट्रो स्टेशनऑफिसेसपासून एक किमी लांब आहे. मुंबईतील काँक्रीटच्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. एका रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर लगेच दुसऱया रस्त्याचे काम सुरू होते. पूर्ण झालेल्या रस्त्यांवर लोकांना गाडय़ा चालवायला मिळणार आहेत का, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला.





























































