सहावीत शिकणारी आशिका जीवानिशी गेली, शाळेसाठी 10 मिनिटे उशीर झाला म्हणून शंभर उठाबशांची शिक्षा; बालदिनी वसईत दुर्दैवी घटना…

शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने पाठीवर दप्तर घेऊन तब्बल शंभर उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याची संतापजनक घटना वसईच्या श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत घडली. यात बारा वर्षांची चिमुकली आशिका गौंड हीचा मृत्यू झाला. शिक्षेनंतर आजारी पडलेल्या आशिकावर आठ दिवसांपासून

जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि तिच्यावर बालदिनीच काळाने घाला घातला. वसई पूर्वेच्या सातीवली येथील कुवरा पाडा परिसरात श्री हनुमंत विद्यामंदिर शाळा आहे. यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. काजल गौंड ऊर्फ आशिका ही विद्यार्थिनी इयत्ता सहावी (अ) वर्गात शिकत होती. 8 नोव्हेंबरला अनेक विद्यार्थी शाळेत उशिराने आल्याने शिक्षकाने सर्व विद्यार्थ्यांना पाठीवर दप्तर घेऊन 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती. यात आशिकाही होती. मात्र शाळेतून घरी परतल्यानंतर आशिकाची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला तातडीने वसईतील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती आणखीनच खालावल्याने तिला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास तिचा मृत्यू झाला आहे.

पालकांनी शाळेला ठोकले टाळे

घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली. शाळा व्यवस्थापन व शिक्षकाच्या हलगर्जीपणामुळेच आशिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी काही पालकांनी शाळेला टाळे ठोकत, जोपर्यंत दोषी शिक्षकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही, असा इशारा दिला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती घेऊन गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती वालीव पोलिसांनी दिली.

गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली दखल

वसईचे गटशिक्षण अधिकारी पांडुरंग गलांगे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शिक्षण विभागाला अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना शिक्षा करणे हा गुन्हा असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पालघरच्या भगिनी समाज विद्यालयातही अशाच पद्धतीने काही महिन्यांपूर्वी 13 वर्षीय विद्यार्थिनीला पाच मिनिटे विलंब झाला म्हणून 50 उठाबशांची शिक्षा दिली होती.