
चिपळूण शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीने मंगळवारी सकाळी ८ वाजता इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या नदीची पाणी पातळी ५.२० मीटर आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
कोळकेवाडी धरणातील पाणीपातळी वाढली
नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे कोळकेवाडी धरण परिसरात झालेला जोरदार पाऊस. गेल्या २४ तासांत, म्हणजे सोमवार सकाळी ८ वाजल्यापासून ते मंगळवार सकाळी ८ वाजेपर्यंत, धरणाच्या परिसरात २२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी १३३.३० मीटरवर पोहोचली आहे आणि धरणातील सर्व मशीन बंद करण्यात आल्या आहेत.
पुढील ३ तास महत्त्वाचे
सकाळी ९:५० वाजता समुद्राला भरती येणार असल्यामुळे पुढील तीन तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळे नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.सध्याची परिस्थिती पाहता, प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापनासाठी जोरदार तयारी केली आहे. नगरपालिका, महसूल, पोलीस आणि एनडीआरए यांची एकूण ११ पथके शहरात विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.नदीकाठच्या ५ ठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून आवश्यकतेनुसार बचावकार्य सुरू करता येईल.
चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी व्यापारी आणि नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील महत्त्वाचा माल सुरक्षित ठिकाणी हलवावा.ज्यांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे, अशा नागरिकांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मदतीसाठी थेट प्रशासनाशी संपर्क साधा.
जगबुडी नदीची पातळी घटली
दरम्यान, एक दिलासादायक बातमी म्हणजे जगबुडी नदीची पातळी ७ मीटरवरून ६.८० मीटरवर आली आहे. पावसाचा जोरही कमी झाल्यामुळे पुढील दोन तास भरतीमुळे निर्माण होणारी संभाव्य धोकादायक परिस्थितीच अधिक महत्त्वाची आहे.