वेदांता समूहाच्या अग्निवेश अग्रवाल यांचे निधन, स्किइंग करताना अमेरिकेत अपघात

वेदांता समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचे अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. अग्निवेश अग्रवाल यांचा काही दिवसांपूर्वी स्किइंग करताना भीषण अपघात झाला होता. या अपघातानंतर त्यांना न्यूयॉर्कच्या माऊंट सायनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते  आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती, मात्र दुर्दैवाने प्रकृती सावरत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. स्वतः अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही अत्यंत वेदनादायी आणि दुःखद वार्ता कळवली. अग्निवेश यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून आणि उद्योग जगतातून अग्रवाल कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

अनिल अग्निवेश यांचा जन्म 3 जून 1976 रोजी पाटणा येथे झाला. त्यांनी अजमेर येथील मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आणि पुढे  यशस्वी व्यावसायिक कारकीर्द घडवली. अग्निवेश यांनी फुजैराह गोल्डच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आणि हिंदुस्तान झिंकचे अध्यक्ष म्हणूनही काम केले.  त्यांनी अल्युवर्क्स लिमिटेडच्या बोर्डावर काम केले आहे आणि वेदांताशी संलग्न असलेल्या वीज कंपनीच्या बोर्डावरही काम केले आहे. त्यांनी 1995 ते 2013 पर्यंत मद्रास ऍल्युमिनियम कंपनी लिमिटेडचे संचालक म्हणून आणि 2009 पासून स्टरलाइट एनर्जी लिमिटेडचे गैर-कार्यकारी संचालक म्हणून काम केले.

आयुष्यातील काळा दिवस…  75 टक्के संपत्ती दान करणार 

अनिल अग्रवाल यांनी आज भावनिक पोस्ट लिहिली. त्यामध्ये त्यांनी मुलाच्या मृत्यूचे वर्णन त्यांच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस असे केले. अग्निवेश हा केवळ माझा मुलगा नव्हता. तर तो माझा मित्र, अभिमान आणि माझे संपूर्ण जग होता, असे म्हटले आहे. या कठीण प्रसंगातही अनिल अग्रवाल यांनी त्यांच्या कमाईतील 75 टक्के भाग समाजाला दान करून त्यांच्या मुलाला दिलेले वचन पूर्ण करणार असल्याचे सांगितले.