
सध्या किरकोळ बाजारात भाज्या चांगल्याच कडाडल्या असून लसणाची फोडणीही महागली आहे. 160 रुपये किलोने मिळणारा हिरवा वाटाणा तब्बल 240 रुपये किलो, तर गवार आणि फरसबीदेखील 200 रुपयांनी महागली आहे. तर लसूण तब्बल 300 रुपये किलोवर गेला आहे.
मसाले, कडधान्यांचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणेच मुश्कील बनले असून गृहिणींच्या किचनचे बजेट अक्षरशः कोलमडले आहे. किरकोळ बाजारात उत्तम दर्जाच्या लसणाचे दर तब्बल 300 रुपये किलोवर गेले असून हे दर आणखी वाढण्याची शक्यता किराणा, भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी दिवाळीपासून लसणाचे दर 150 ते 200 रुपये किलो इतके होते, मात्र लहरी हवामान, मध्येच मुसळधार पाऊस तर अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती याचा फटका लसणालाही बसला आहे. लसणाचा सीझन फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो. त्यामुळे पावसाळ्यात आपोआपच दर वाढतात. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपल्याने लसणाचे पीक कमी आले आहे. त्यामुळे लसणाची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याचे चित्र असून लसणाचे दर गगनाला भिडले आहेत.
- किरकोळ बाजारात लसूण 300 रुपये किलोने मिळत आहे.
- साधा लसूण 200 रुपये किलो तर सोललेला लसूण 400 रुपये किलो आहे.
- गावरान लसणाचा दर 500 रुपये किलोवर गेला आहे.
एक नंबर लसूण आणि भाजीचे दर सध्या वाढलेले आहेत. ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल हवा असतो, परंतु काही ग्राहक किमतीवरून हुज्जत घालतात. काही भाज्यांचे दर स्थिर आहेत, परंतु काही भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. मागणी अधिक असून बाजारात माल कमी येत आहे, असे ठाणे येथील भाजीविक्रेते रामविलास कुशवाह यांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला खराब झाला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सध्या बाजारात मागणी मोठी आणि आवक कमी आहे. त्यामुळे काही भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. लहरी हवामानामुळे माल बाजारात येईपर्यंत खराब होतो. अशा वेळी पुन्हा माल कमी राहातो. त्यामुळे दर वाढले आहेत, असे एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला व्यापारी शंकर पिंगळे म्हणाले.