
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता बळावली आहे. कारण आगामी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत विराट कोहलीचा हा संघ आपले घरचे सामने बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याचबरोबर राजस्थान रॉयल्सचेही ‘होम ग्राऊंड’ असलेले जयपूरचे स्टेडियमही धोकादायक असल्याचा अहवाल असल्याचे वृत्त असून हा संघ पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमला होम ग्राउंड बनविण्याची दाट शक्यता आहे.
बंगळुरू संघाने गतवर्षी आयपीएलचे विजेतेपद पटकाविल्यानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सव कार्यक्रमातील भीषण चेंगराचेंगरीनंतर चिन्नास्वामीवर अक्षरशः टाळं लागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरसीबीला ‘होम ग्राऊंड’साठी राज्याबाहेर भटपंती करावी लागणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरसीबी संघ आपले घरचे सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम आणि रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळवण्याची तयारी करत आहे. प्रस्तावित आराखडय़ानुसार नवी मुंबईत 5, तर रायपूरमध्ये 2 सामने होऊ शकतात. धक्कादायक बाब म्हणजे, आयपीएल 2026 साठी चिन्नास्वामी स्टेडियम वापरण्याबाबत आरसीबीने अद्याप कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेशी (केएससीए) कोणताही संपर्क साधलेला नाही.
आरसीबीसाठी ‘ब्लॅक डे’
4 जून रोजी आयपीएल जेतेपदानंतर बंगळुरूत आयोजित करण्यात आलेले आरसीबीचे विक्ट्री सेलिब्रेशन आनंदाऐवजी शोकांतिकेत बदलले. खराब नियोजन, अपयशी गर्दी नियंत्रण आणि परवानगीशिवाय काढण्यात आलेल्या परेडमुळे चेंगराचेंगरी उसळली आणि 11 निष्पाप चाहत्यांना जीव गमवावा लागला. अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर कर्नाटक सरकारने चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठय़ा कार्यक्रमांबाबत कठोर भूमिका घेतली. परिणामी, बीसीसीआयलाही विजय हजारे ट्रॉफी आणि महिला विश्वचषकातील काही सामने बंगळुरूबाहेर हलवावे लागले.
सरकारचा ठपका थेट आरसीबीवर
कर्नाटक सरकारच्या अहवालात या दुर्घटनेसाठी थेट आरसीबीला जबाबदार धरले आहे. विक्ट्री परेडसाठी सरकारची कोणतीही परवानगी न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला असून अहवालात विराट कोहलीचाही उल्लेख आहे. न्यायमूर्ती जॉन मायकेल कुन्हा आयोगाच्या अहवालात चिन्नास्वामी स्टेडियम मोठय़ा आयोजनांसाठी असुरक्षित असल्याचा स्पष्ट निर्वाळा देण्यात आला आहे.
राजस्थान रॉयल्सची पुण्याला पसंती
दरम्यान, राजस्थान रॉयल्सचेही ‘होम ग्राऊंड’ धोक्यात आले आहे. जयपूरच्या स्टेडियमची अवस्था नाजूक असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघही आगामी आयपीएलमधील घरचे सामने पुण्याच्या गहुंजेतील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर खेळवण्याचा विचार करत आहे. स्टेडियम नूतनीकरणाशिवाय सामने घेणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापन समितीने पुण्यातील गहुंजे स्टेडियमची पाहणी केलेली आहे. त्यामुळे यंदा पुण्यात आयपीएलचे सामने होण्याची शक्यता बळावली आहे. येत्या काही दिवसांत राजस्थान रॉयल्सकडून याबाबत अधिकृत खुलासा होणार असल्याची माहिती एमसीएच्या सूत्रांनी दिली. सुरक्षा, नियोजन आणि जबाबदारीच्या प्रश्नांमुळे आगामी आयपीएल आधीच वादाच्या भोवऱ्यात अडकले असून आरसीबी आणि राजस्थान रॉयल्ससारख्या संघांना आपल्या ‘घरापासून’ दूर जावे लागणार, हे आता जवळपास निश्चित आहे.



























































