‘लक्ष्याचा आवाज’ हरपला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायक विनय मांडके म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आवाज. त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी पार्श्वगायन केले.  ‘हमाल दे धमाल’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘प्रेम करूया खुल्लम खुल्ला’, ‘गडबड घोटाळा’, ‘अफलातून’, ‘शेम टू शेम’, ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘धडाकेबाज’ या चित्रपटांतील मांडके यांनी गायलेली गाणी सुपरहिट झाली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या काही हिंदी चित्रपटांसाठीही त्यांनी पार्श्वगायन केले. विनय मांडके यांनी ‘राजेंद्र – विनय’ या नावाने संगीत दिले.  ‘बिन कामाचा नवरा’, ‘गौराचा नवरा’ आणि  दादा काsंडके यांचा सुपरहिट चित्रपट ‘मुका घ्या मुका’ हे त्यांनी संगीत दिलेले चित्रपट आहेत.

ऑर्केस्ट्राची ‘सुनहरी यादें’…

विनय मांडके यांनी ऑर्केस्ट्रापासून संगीत कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांच्या संगीत प्रवासात ‘मिलन’ ऑर्केस्ट्रा, ‘सुनहरी यादें’ ऑर्केस्ट्रा हे महत्त्वाचे टप्पे ठरले. प्रमिला दातार यांच्या ‘सुनहरी यादें’चे त्यांनी दोन वर्षांत देशभरात 500 हून अधिक कार्यक्रम केले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या समवेत त्यांनी लाईव्ह शो केले. याव्यतिरिक्त अनेक नामवंत गायक-गायिकांसमवेत कार्यक्रम केले.

जाहिरात-जिंगल्स गायनात यश

 विनय मांडके यांनी 1986 पासून रेडिओ आणि दूरदर्शन माध्यमांमध्ये वापरल्या गेलेल्या सर्व भाषांमधील सात हजारांहून अधिक जिंगल्स गायल्या. पी. पी. वैद्यनाथन, वनराज भाटिया, लुई बँक्स, वेदपाल, लेस्ली लुईस यांसारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. ‘हमारा बजाज’, ‘कल भी आज भी’ (व्हीआयपी लगेज),  ‘लिप्टन चहा’, ‘टाटा स्टील’, ‘ओके साबण’, ‘लाइफबॉय’, ‘प्रेस्टीज कुकर’, ‘एमडीएच मसाले मोहीम’, ‘विक्को वज्रदंती’ अशा अनेक जाहिरातींसाठी त्यांनी आवाज दिला.