
रील्ससाठी तरुणाई नको ती जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रीलसाठी एका अल्पवयीन मुलाने जे केले ते पाहून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. रीलसाठी हा मुलगा ट्रॅकच्या मध्ये झोपला आहे आणि वरून रेल्वे जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले.
ओडिशाच्या बौद्ध जिल्ह्यात पुराणपाणी स्टेशनजवळील दलुपलीजवळ ही घटना घडली. तीन अल्पवयीन मुलांना जीवघेण्या स्टंटसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अनेक वर्षांच्या जनतेच्या मागणीनंतर बौद्ध जिल्ह्यातील अनेक भागात अलीकडेच रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या.
व्हिडिओमध्ये एक मुलगा रेल्वे ट्रॅकमध्ये झोपलेला दिसत आहे. यावेळी एक धावती रेल्वे ट्रॅकवरून जात आहे. मुलाचा एक मित्र हा व्हिडिओ शूट करत होता तर दुसरा दिग्दर्शित करत होता. स्टंट पाहणारे टाळ्या वाजवताना ऐकू येत आहे. स्टंट केल्यानंतर मुलगा उभा राहून फोटोसाठी पोज देत आहे आणि त्याचे मित्र आनंदाने ओरडत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. मित्रांनी ही कल्पना सुचवल्याचे रुळावर झोपलेल्या मुलाने सांगितले.