ट्रेंड – सावलीला साथ

पती-पत्नी हे नातंच वेगळं असतं. नातं म्हटलं की रुसवे-फुगवे, आदळआपट, भांडणं हे सगळं आलंच, पण या सगळ्याच्या तळाशी मायेचा-प्रेमाचा ओलावा असला की वणवाही गारव्यासारखा भासायला लागतो. एकमेकांना समजून घेत, एकमेकांचा आदर करत चालत राहिलं की संसार सुखाचा होतो. इन्स्टाग्रामवर सध्या ट्रेंडमध्ये असलेला एक व्हिडीओ याचंच प्रतीक आहे. भरउन्हात अंगणात पूजाअर्चा करणाऱ्या एका महिलेचा हा व्हिडीओ आहे. महिलेला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तिचा पती ‘मिनी फॅन’ने तिला वारा घालताना दिसत आहे. जणू तो आपल्या सावलीला साथ करतो आहे. हे करत असतानाच तो मनोभावे पूजा विधीही न्याहाळतो आहे. या दोघांच्या व्हिडीओवर हजारो लाइक्स व प्रतिक्रिया आल्या आहेत. @thelilroarsoumya या इन्स्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ तुम्हालाही पाहता येईल.