
महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत महसुली कामकाजाशी संबंधित प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर दक्षता पथके तसेच राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
गौण खनिज, जमीन, मुद्रांक, जमीन मोजणी आणि महसुली कामकाजाशी संबंधित प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या स्तरावर दक्षता पथक असेल. हे पथक आलेल्या प्रत्येक तक्रारीची 30 दिवसांच्या आत आणि अत्यंत गंभीर तक्रारींची 15 दिवसांच्या आत प्राथमिक चौकशी करून अहवाल सक्षम प्राधिकाऱ्यास सादर करेल. दक्षता पथकाने कोणत्याही ठिकाणी कोणतीही तपासणी करताना पथकातील किमान चार अधिकारी उपस्थित असावेत. पथकातील कोणत्याही एका अधिकाऱ्यास स्वतंत्रपणे चौकशी करता येणार नाही.
दक्षता पथकांच्या कामांचे वेळोवेळी पुनरावलोकन करून आवश्यक त्या सुधारणा सुचविण्यासाठी राज्यस्तरावर महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.

























































