
आखातात युद्ध पेटल्यानंतरही निष्क्रिय राहिलेल्या मोदी सरकारमुळे देशात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संतापलेले मुंबईकर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आज रस्त्यावर उतरले. विक्रोळी मतदारसंघात आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. पंतप्रधान मोदींच्या कल्पनेतून जन्मलेल्या ’गटार गॅस’चे प्रतिकात्मक वाटप यावेळी करण्यात आले.
लोक सिलिंडरसाठी वणवण करत असताना सरकार मात्र तुटवडा नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे लोकांच्या संतापात भर पडली आहे. त्या संतापाला आज कांजूरमार्ग पूर्व येथे आक्रोश मोर्चाने वाचा पह्डली. डोक्यावर सिलिंडर घेऊन लोक मोर्चात सहभागी झाले. ‘सरकारने निवडणुकीपुरती गाजरे न दाखवता सर्वसामान्यांना खरोखरचा दिलासा द्यावा, अन्यथा हा आक्रोश सरकारला महागात पडेल. गॅस सिलिंडरची दरवाढ तातडीने मागे न घेतल्यास संपूर्ण मुंबईत हे आंदोलन तीव्र होईल, असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी दिला. यावेळी बाबा कदम, रश्मी पहुडकर, दीपक सावंत, श्वेता पावसकर, सुनिता जाधव, विश्वास शिंदे, आनंदा पाटाडे, चंद्रशेखर जाधव, सिद्धी जाधव, परम यादव, दिपाली पाटील, रवींद्र महाडिक, निलेश पोहकर, सचिन मदने, मामी मंचेकर, शंकर ढमाले आदी उपस्थित होते.
भररस्त्यात ‘गटार गॅस’चे प्रात्यक्षिक
गटारातून निघणाऱया गॅसवर चहा बनवता येऊ शकतो, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केला होता. त्यांच्या या दाव्याची खिल्ली मोर्चेकऱयांनी उडवली. सरकारचा निषेध म्हणून आंदोलकांनी यावेळी ‘प्रतिकात्मक गटार गॅस’चे वाटप केले. तसेच ‘गटार गॅस’चे प्रात्यक्षिक दाखवत सरकारचा धिक्कार करण्यात आला. ‘आश्वासन नको गॅस हवा, सरेंडर करो, सिलेंडर दो!’ असे फलकही झळकावण्यात आले.






























































