प्रेमी युगुलाने धावत्या एक्प्रेसपुढे झोकून देत जीवन संपवले

रविवारी दुपारी विक्रोळी रेल्वे स्थानकात थरारक घटना घडली. एका प्रेमी युगुलाने वेगात येणाऱया गरीब रथ एक्स्प्रेससमोर झोकून देत आपले आयुष्य संपवले. गंभीर म्हणजे आत्महत्या करणारी मुलगी 15 वर्षांची होती.

भांडुप पश्चिमेकडील हनुमान नगरात दोघे राहायला होते. मुलगी नववी इयत्तेत शिकत होती, तर मुलगा कुरियर बॉयचे काम करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. मुलगा अशिक्षित तसेच त्याच्यावर, त्याचे वडील व भावावर गुन्हे दाखल होते. याबाबत मुलीच्या पालकांना समजल्यावर त्यांनी मुलीला समजावून सांगितले. तसेच तिला आईसोबत गावी जाण्यास सांगितले, पण याबाबत नितेश तंगडपल्ली (20) या प्रियकराला माहीत झाले. त्याने रविवारी सकाळीच मुलीचे घर गाठून तिच्या वडिलांशी वाद घातला व मुलीला गावी पाठवू नका असे बजावले. त्यानंतर मुलगी आजीसोबत घराबाहेर पडली आणि तेथून नितेशला जाऊन भेटली. मग दोघांनी थेट विक्रोळी स्थानक गाठून फलाट क्रमांक 4 वरून मुंबईच्या दिशेने येणाऱया गरीब रथ एक्स्प्रेससमोर झोकून दिले. यात दोघांचाही मृत्यू झाला.

कुर्ला रेल्वे पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून मुलीच्या घरच्यांचा आमच्या प्रेमाला विरोध असल्याने आम्ही हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यात नमूद केले आहे. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे.