
चिपळूण-गुहागर मार्गावरील मिरजोळी परिसरातील खड्ड्यांची दुरवस्था पाहून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) खड्ड्यातच उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. या खड्ड्यांमुळे नुकत्याच झालेल्या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, संबंधित ठेकेदाराने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मिरजोळीच्या या आंदोलनाला कोंढे आणि शिरळ येथील ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
गुहागर मार्गावर साखरवाडी ते साई मंदिरापर्यंत ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठीही प्रवासाचा त्रासदायक झाला आहे. याच खड्ड्यामुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्यावर सध्या मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेला राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने केला आहे.
या घटनेनंतर, स्मारक समितीने प्रशासनाला एक निवेदन दिले होते. त्यात या जखमी महिलेला त्वरित नुकसान भरपाई द्यावी आणि सर्व खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी केली होती. अन्यथा, १५ ऑगस्ट रोजी मिरजोळीतील काही ग्रामस्थ खड्ड्यात, काही जण राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयासमोर, तर काही पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता.
या इशाऱ्यानंतर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे अधिकारी नाजीम मुल्ला यांनी संबंधित ठेकेदारांना सात दिवसांच्या आत हे सर्व खड्डे पेव्हरब्लॉकने भरण्याचे आदेश दिले होते. तसेच, याबाबतचा अहवाल छायाचित्रांसह सादर करण्यास सांगितले होते. ही मुदत संपूनही ठेकेदारांनी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मिरजोळीच्या या लढ्याला आता शिरळ आणि कोंढे येथील ग्रामस्थांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.’