वाड्यातील वरसाळे शाळेला टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा; पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी एकच शिक्षक, 141 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात

वरसाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या मार्गांना शिकवण्याची जबाबदारी एकच शिक्षकावर आली आहे. त्यामुळे या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४१ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात सापडले आहे. वरसाळे जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून ही मॉडेल स्कूल म्हणून गणली जाते. मात्र शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. जर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शाळेला शिक्षक मिळाले नाही तर शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

वाडा तालुक्यातील दुर्गम भागात वरसाळे हे गाव असून या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत ४१७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत १४१ विद्यार्थी असताना एकच शिक्षक कार्यरत आहे. चालू महिन्यात तूर्त अध्यापनासाठी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेने माहिती मागवली असता त्या यादीमध्ये वरसाळे शाळेचा उल्लेखसुद्धा केलेला नाही असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बाळू कडाळी यांनी केला आहे.

उडवाउडवीची उत्तरे
दोन दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी शिक्षक मिळावा म्हणून शिक्षण विभागाला विनंती केली. विद्यार्थ्यांच्या पटानुसार दोन शिक्षकांची गरज आहे असे गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर गटशिक्षणाधिकारी उमेश सातपुते यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आहे त्या शिक्षकांनाच सर्व वर्गात शिकवायला सांगा, असे बेजबाबदार विधान केले असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बाळू कडाळी दिली.

शिक्षक मिळावा म्हणून ग्रामस्थांनी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे तक्रार विनंत्या करूनही शिक्षण विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. सद्यस्थितीत शाळेवर तात्पुरत्या स्वरूपात एक शिक्षक दिला असून आता शिक्षकांची संख्या दोन झाली आहे.

पटानुसार चार शिक्षकांची गरज असतानाही फक्त कायमस्वरूपी एक व तात्पुरत्या स्वरूपात एक असे दोन शिक्षक शिकवण्याचे काम करीत असले तरी आणखी दोन शिक्षकांची गरज शाळेला आहे. येत्या आठ दिवसांत शिक्षक न दिल्यास शाळेला टाळे ठोकू असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी शिक्षण विभागाला दिला आहे.

वरसाळे शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग असून येथे मुख्याध्यापक, सहशिक्षक व पदवीधर शिक्षक असे कार्यरत आहेत. मात्र एक शिक्षकाची येथे कमतरता असून येत्या शिक्षक समायोजनेत या शाळेला एक शिक्षक देण्यात येईल.
– उमेश सातपुते, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती वाडा